महावितरण कंपनीचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भोंगळ कारभारामुळे या कंपनीचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर आकडे टाकून चोरून वीज वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढत असल्यामुळे वीज गळती मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या लोणी काळभोर या परिसरात महावितरण कंपनीचे अधिकाऱ्यांनी तब्बल 3 लाख रुपयांची वीज चोरी पकडली आहे. याप्रकरणी महावितरण कंपनीच्या लोणी काळभोर शाखेचे सहाय्यक अभियंता रामप्रसाद सुखदेव नरवडे यांच्या फिर्यादीनुसार विजय बाळासाहेब काळभोर (रा. लोणी काळभोर तालुका हवेली जिल्हा पुणे) यांच्याविरुद्ध वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाय्यक अभियंता नरवडे आणि महावितरण कंपनीचा कर्मचारी सिताराम चौधरी हे लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतल्या वडाळे वस्ती परिसरात वीज बिलांची वसुली करत असताना हा प्रकार समोर आला. विजय काळभोर हे त्यांच्या पोल्ट्री फार्म साठी चोरून वीज वापरत असल्यास यावेळी स्पष्ट झालं आहे. काळभोर याची 11 हजार 480 रुपये इतकी वीज बिलाची थकबाकी होती. काळभोर यांनी अनधिकृतपणे वीजेचा वापर केल्यामुळे महावितरण कंपनीचे 2 लाख 96 हजार 629 रुपयांचा नुकसान झाल्याचं लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.