अनैतिक वापर झालेल्या, भंगार बसेसवरून ‘ शिवशाही ‘ हे नाव तातडीने हटवा
महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील लोकं शिवशाही बसेसना वैतागले आहेत. अगदी बायपासला फलाटाला शिवशाही लागली, तर प्रवासी रांग सोडून बाहेर होतात. शिवशाहीचे जागोजागी पेट घेणे, रस्त्यात कुठेही नादुरुस्त होवून दुकान मांडणे, पुर्जे पुर्जे खडखडाट होणे, शिवशाही पेक्षा मागच्या मागच्या साध्या बसेस पुढे निघुन जाणे, ए सी चा लाभ पेक्षा डोकेदुखीच अधिक, अशी अधिकची भाडे रक्कम भरून अधिकची डोकेदुखी प्रवाशांच्या वाट्याला येत असल्याने, ‘नको ती शिवशाही बस’ अशी राज्यभर अवस्था आहे. खरे तर उभ्या महाराष्ट्रातील छ.शिवाजी महाराज प्रेमींनी ‘शिवशाही ‘ या महान संकल्पनेचा गैरवापर होत असलेल्या या बसेसना, शिवशाही हे नाव वापरण्यास तातडीने बंदी घालण्याची मागणी केली पाहिजे.
राज्यभर या बसेस बाबत प्रवाशांची तीव्र नाराजी असताना, या खाजगी बसेस बाबत महामंडळाच्या कारभाऱ्यांना या बसेसच्या ठेकेदाराविषयी एवढे प्रेम कां दाटून येते? प्रवाशांच्या जिविताशी खेळणाऱ्या या बसेस सेवेत ठेवण्याबाबत यांचा इतका अट्टाहास कां? या बसेस भाडे तत्वावर घेण्याचा प्रारंभी महामंडळाने जो करार केला आहे, त्याची एकदा चिरफाड होणे आता आवश्यक झाले आहे. खाजगी ठेकेदाराशी करार करताना कुणा – कुणाची दाबून चांदी झाली. त्यानंतर हा घपलेवाला ठेका चालविण्यात, प्रवाशांची प्रचंड नापसंती असताना हा ठेका सतत चालू ठेवण्यात दरमहाचा काय ‘ व्यवहार ‘ होतो? असा प्रश्न एखाद्या त्रस्त प्रवाशाने विचारला तर काय उत्तर देणार? अशी अनेक प्रश्नचिन्हे निर्माण झाली आहेत? चालत्या शिवशाही बसेस इतक्या वेळेस धो ss धो पेटल्या आहेत, की प्रवासी आता त्यांना ‘ धावत्या मृत्यूपेट्या ‘ म्हणून संबोधू लागले आहेत. धावत्या शिवशाहीची आग, रस्त्यात ब्रेक डाऊन, खडखडाट – दडदडाट, वगैरे वगैरे कमी पडले की काय?
आता या शिवशाही बसेसचा तरूणीवर बलात्कार करण्यासाठी नराधम उपयोग करू लागले आहेत. पुण्यात स्वारगेट बस स्थानकावर पहाटे साडेपाच वाजता फलटनला जावू पाहणाऱ्या तरुणीस ही शिवशाही बस फलटणला जाईल, असे भासवून त्या बसमध्ये नेले व तेथे बलात्कार केला. स्थानकात सुरक्षा व्यवस्थे समोरच मधोमध उभ्या शिवशाही बसमध्ये ही घटना घडली. राज्यभरात अनेक ठिकाणी शिवशाही बसेस बंद पडून उभ्या आहेत. यातील ज्या खाजगी ठेकेदाराच्या नादुरुस्त शिवशाही बसेस आहेत, त्या त्याने आपल्या खाजगी जागेत लावल्या पाहिजेत.
एसटीच्या आगार व स्थानकात त्यांचे काय काम? खाजगी ठेकेदार महामंडळाची स्थानक व आगराची जमीन डंपिंग ग्राउंड म्हणून कसा काय वापरू शकतो? नेहमीच शिवशाही ठेकेदारासाठी पायघड्या घालणाऱ्या महमंडळाच्या यंत्रणेला याचा जाब द्यावा लागणार आहे. डंपिंग ग्राउंड प्रमाणे ही शिवशाही महामंडळाच्या जागेत उभी नसती, तर त्या नराधमास असले पापकृत्य करण्यासाठी सुविधाच उपलब्ध झाली नसती. अधिक गंभीर बाब म्हणजे, या घटने नंतर इतर ना दुरुस्त बंद शिवशाही बसेसची झाडा झडती घेण्यात आली, तेव्हा त्यात चादरी – कंडोम वगैरे वगैरे काय नको, त्या वस्तु सापडल्या, याचा अर्थ अनेक दिवस – महिन्यांपासून या शिवशाही बसेसचा अनैतिक कृत्यांसाठी धंद्यांसाठी, ड्रग्ज दारू अंमली पदार्थ सेवनासाठी व कदाचित अत्याचार – बलात्कारासाठी सर्रास वापर सुरु होता.
या बाबत स्वारगेटच्या एसटी महामंडळ अधिकाऱ्यांना जाब विचारला गेला पाहिजे. ‘ तेवीस सुरक्षा रक्षक निलंबित केले. ठिक आहे. पण बड्या अधिकाऱ्यांचे काय? महाराजाच्या शिवशाहीत माय भगिनींचा प्रचंड सन्मान होता. या सन्मानास धक्का लावणाऱ्या रांझांच्या पाटलाचा चौरस होत असे तर शत्रु कल्याणच्या सुभेदाराची सुन सन्मान पुर्वक ओटी भरून माघारी पाठविली जात असे. ही होती खरी ‘ शिवशाही!’ अनैतिक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या या बसेस, खरे म्हणजे खाजगी ठेकेदाराच्या या सर्व बसेस आता ‘ निकाल बाहर ‘ करण्याची वेळ येवून ठेपली आहे. जुनाट चेसीस इंजिनवर तकलादू बॉडीच्या काही शिवशाही बसेसने राज्याला वैताग आणला आहे. एसटीचे मंत्री, बडे अधिकारी काही करतील, ही अपेक्षा सोडून द्या! खुद्द मुख्यमंत्र्यांनी मागील बसखरेदी प्रकरणासारखे या खाजगी शिवशाही बसेस महामंडळात लावण्याचा करार, तो कंटिन्यू सुरु ठेवण्याचा अट्टाहास याची सखोल चौकशी लावली पाहिजे. योगायोगाने त्यांच्या जवळ संजय सेठी सारखे अधिकारी उपलब्ध आहेत. त्यांना या शिवशाही कराराचे खोदकाम करून ‘ फॅक्ट फाईंडिंग ‘ करावयाची जबाबदारी टाकली पाहिजे.
तसे झाले तर खूप मोठे घबाड बाहेर येवू शकेल. सर्वात पहिले राज्याच्या अस्मितेचा मानबिंदु असणारा ‘ शिवशाही ‘ हा शब्द या भंगार व धावत्या मृत्युपेट्या बनलेल्या बसेस वरून हटविण्याचा आदेश झाला पाहिजे. कारण ‘ शिवशाही ‘ या शब्दाला प्रचंड वलय आहे. मान आहे, सन्मान आहे. या एका शब्दाच्या उच्चारण्याने एका आदर्शाची प्रतिमा उभी राहते. महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी बांधवांच्या मनात ‘ शिवशाही ‘ या एका शब्दाची प्रचंड उत्तुंग अशी प्रतिमा आहे. ती प्रतिमा अशा भंगड बसेसना वापरणे, ही बाब प्रत्येक मराठी मनाला न पटणारी आहे.
माननीय मुख्यमंत्र्यांनीच आता यात लक्ष घालावे. या भंगड बसेसवरून तातडीने हे महान नाव हटविण्याचे आदेश द्यावेत. या बसेसचा खाजगी करार करतानाचा ‘ व्यवहार ‘ व इतक्या प्रचंड दुरवस्थेनंतरही या खाजगी ठेकेदारास कवटाळत बसणाऱ्या महामंडळाच्या अधिकार्यांची चौकशी झाली पाहिजे. राज्यातल्या सर्व प्रवासी संघटनांनी कामास लागले पाहिजे.