असं म्हटलं जातं, की हिंदवी स्वराज्याची संस्थापक छत्रपती शिवराय हे पृथ्वीतलावरचे अखेरचे सार्वभौम, शूरवीर, बलशाली राजे होते, युगपुरुष होते. कारण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांच्या कार्य कर्तृत्वाची छाप संपूर्ण जगावर पडलेली आहे. फ्रान्समध्ये छत्रपती शिवरायांची अप्रकाशित असलेली बखर नुकतीच सापडली आहे. पुण्याचे इतिहास संशोधक आणि लेखक गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी हे जुनी कागदपत्रं चाळत असताना त्यांना मोडी लिपीत असलेली हस्तलिखित स्वरुपातली ही बखर सापडली.
साधारणपणे 1740 नंतर ही बखर लिहिलेली असावी, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची संपूर्ण कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीमध्ये आढळतो.
सहा महिन्यांपूर्वी फ्रान्सच्या बी. एन. एफ. या हस्तलिखित पान विभागात जुनी कागदपत्रं पाहताना या दोघांना मोडी लिपीतली काही कागदपत्रं दिसून आली.
छत्रपती शिवरायांचं चरित्र सर्वांसमोर येणार…!
छत्रपती शिवरायांची एखादी बखर प्रकाशित होऊन सुमारे 60-70 वर्षे उलटली आहेत. मराठी साम्राज्याची छोटी बखर आणि त्यातली थोडी हकीगत या बखरीशी जुळते आहे. 84 पानांची ही मूळ मोडी बखर असून या बखरीतून त्यावेळचं लोकजीवन आणि शिवरायांचं संपूर्ण चरित्र सर्वांसमोर येणार आहे, अशी माहिती इतिहास अभ्यासक गुरुप्रसाद कानिटकर यांनी दिलीय.