अखेर तीन अपत्य प्रकरणी सुनावणी सुरू… विभागीय सहनिबंधकांनी मागविल्या साक्षांकित प्रती..! पुढील सुनावणी ११ जून रोजी
पालघरः ठाणे-पालघर प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत तीन अपत्य असताना उभे राहून सहकार कायद्याचा भंग केल्याच्या प्रकरणातील पदवीधर शिक्षक प्रकाश मरले यांच्यासह तक्रारदारांचे म्हणणे आज विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी ऐकून घेतले. मरले यांनी कागदपत्र व अन्य पुराव्यासाठी वेळ मागून घेतल्याने आता पुढील सुनावणी ११ जून रोजी ठेवण्यात आली आहे.
ठाणे-पालघर शिक्षक पतपेढीच्या निवडणुकीत मरले दोन वेळा संचालक म्हणून निवडून आले. सहकार कायद्याच्या १९६० च्या कलमानुसार एक सप्टेंबर २००२ नंतर तिसरे अपत्य झाले असेल तर अशा व्यक्तीला निवडणुकीला उभे राहता येत नाही. अशी व्यक्ती निवडून आली, तरी त्याचे सदस्यत्व रद्द होते.
विभागीय सहनिबंधकांपुढे मांडले म्हणणे
या प्रकरणात दोन शिक्षकांनी निवडणूक आयोग, ठाणे जिल्हा उपनिबंधक तसेच ठाणे-पालघर शिक्षक पतसंस्थेकडे तक्रार करूनही त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे आता या तक्रारदारांनी विभागीय सहनिबंधकाचे दरवाजे ठोठावले. भालेराव यांनी संबंधितांना नोटिसा पाठवून आज म्हणणे मांडण्यासाठी बोलवले होते. त्यानुसार तक्रारदार तसेच मरले आणि ठाणे पालघर शिक्षक पतसंस्थेचे अधीक्षक विभागीय सहनिबंधक कार्यालयात हजर होते.
मरले यांना तिसरे अपत्य असल्याचा हवा पुरावा!
या वेळी मरले यांनी आपल्याला कागदपत्रे पहावे लागतील तसेच पुराव्याची सत्यता तपासून पाहावी लागेल, असे सांगून वेळ मागून घेतली. विभागीय सहनिबंधकांनी दोघांचे म्हणणे ऐकून पुढील सुनावणी ११ जून रोजी ठेवली आहे. तक्रारदारांकडून साक्षांकित प्रती मागितल्या आहेत. शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेले दाखले सत्य आहेत, असे तक्रारदारांनी सांगितले; परंतु विभागीय सहनिबंधकांनी दाखले साक्षांकित करून हवे असल्याचे निदर्शनास आणले आणि हे दाखले सादर करण्यासाठी ११ जून पर्यंतची मुदतही दिली.
‘तक्रारदार आणि ज्याच्या विरुद्ध तक्रार आहे अशा दोघांचे म्हणणे मी ऐकून घेतले. साक्षांकित प्रती सादर करण्यासाठी त्यांना मुदत दिली आहे. कोणत्याही दबावाला किंवा व्यक्ती कोण आहे हे न पाहता पुरावे आणि कागदपत्र पाहूनच मी निर्णय देणार आहे.अर्जदार व तक्रारदार दोघेही शिक्षक असल्याने मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच नवीन शैक्षणिक वर्ष चालू होण्यापूर्वीची तारीख देण्यात आली आहे.
-मिलींद भालेराव, विभागीय सहनिबंधक, कोकण भवन