‘ही’ आहेत शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय बदलविण्याची कारणं!

spot_img

‘ही’ आहेत शरद पवारांच्या राजीनाम्याचा निर्णय बदलविण्याची कारणं!

नवीन नेतृत्वाला संधी दिली पाहिजे, भाकरी फिरवली नाही तर ती करपते, असे विधान पवार यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मुंबईतील मेळाव्यात अलीकडेच केले होते. नवीन नेतृत्वाला संधी देणार म्हणजे पवार काय करणार? जयंत पाटील, अजित पवार या जुन्या चेहऱ्यांऐवजी नवीन चेहरे समोर आणणार का? या चर्चेला ऊत आला होता. मात्र २ मे रोजी त्यांनी स्वत:च पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोडण्याचा निर्णय जाहीर करून जबरदस्त धक्का दिला.

गेल्या तीन दिवसांत झालेल्या वेगवान घडामोडींनंतर आता त्यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले आहे. पक्षाला उत्तराधिकारी देण्यासह संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर आपला भर असेल, असे पवार यांनी स्पष्ट केले आहे. याचा अर्थ पक्षातील प्रस्थापित नेत्यांऐवजी ते आता नवीन चेहऱ्यांना पुढे आणतील, असे मानले जात आहे.

ते राजीनामा मागे घेणारच होते. मात्र पक्षावर आजही आपलीच पकड असल्याचे त्यांनी राजीनाम्याच्या घोषणेनंतर जो भावनांचा उद्रेक झाला, त्यावरून सिद्ध केले. पक्ष आपल्यासोबत असल्याचे पवार यांना पक्षात वेगळा विचार करणाऱ्यांना दाखवून द्यायचे होते, ते साध्य झाले. पवार यांनी आधी राजीनाम्याची घोषणा तर केली, पण नवीन नेतृत्वाच्या हाती पक्ष देण्याची ही वेळ नाही, कालांतराने तसे करता येईल हे त्यांच्या नंतर लक्षात आले.

आज पक्षाध्यक्षपद सोडले तर पक्ष फुटेल व त्याचा फायदा इतर पक्षांना होईल, असा अंदाज त्यांना आला असावा. त्यातून त्यांनी आजचा निर्णय घेतला. सुप्रिया सुळे यांना पक्षाध्यक्षपद दिले तर ते पक्षात एकमताने स्वीकारले जाईल का, याबाबत शरद पवार यांना शंका होती. सुप्रिया यांना अध्यक्ष केलेही असते तरी पक्षावर अजित पवार यांचाच प्रभाव राहिला असता. त्यातून पक्षात विसंवाद निर्माण झाला असता. लोकसभा, विधानसभा निवडणूक समोर असताना असे चित्र निर्माण होऊ नये, म्हणून पवार यांनी अध्यक्षपदी कायम राहण्याचे ठरविले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :