हिंदी भाषिक उत्तरप्रदेशात आजही आहे मराठी बोलणार्यांचं एक अख्खं गाव!
काय आहे या गावाचं नाव, काय आहे या गावाचा इतिहास? जाणून घ्यायचंय? मग वाचा हा लेख सविस्तरपणे!
उत्तरप्रदेश! भारतातलं मोठं राज्य आणि हिंदी भाषिकांची राजधानी! मात्र हिंदीचा अभिमान असलेल्या या उत्तरप्रदेशमध्ये चक्क एक गाव मराठी बोलणार्या लोकांचं आहे. तुम्हाला माहित आहे, उत्तरप्रदेशातल्या या मराठी लोकांच्या गावाबद्दल? काय सांगता नाही? तर मग वाचा की हा अभ्यासपूर्ण लेख!
चला तर मग, जास्त वेळ वाया न घालवता याविषयी जाणून घेऊ. तर उत्तरप्रदेशमध्ये असलेल्या या मराठी लोकांच्या गावाचं नाव आहे. बिठूर उर्फ ब्रह्मावर्त! हे गाव महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर आहे तर कानपूरपासून अवघ्या 20 किलोमीटर अंतरावर आहे.
या गावाला मोठा इतिहास आहे. 1 जून 1818 रोजी दुसर्या बाजीराव पेशव्यांनी इंग्रज अधिकारी माल्कमसोबत अखेरचा तह केला. त्यावेळी त्यांच्यासोबत तब्बल अडीच हजार लोकं होती. इंग्रजांनी त्यांना 24 तासांच्या आत शरण यायला सांगितलं.
3 जून 1818 रोजी दुसर्या बाजीराव पेशव्यांना इंग्रजांनी अटक केली. तातडीनं महाराष्ट्राबाहेर पाठवण्यात आलं. त्यावेळी उर्वरित पेशव्यांनी आयुष्याचा उत्तरार्ध बिठूर म्हणजे ब्रह्ववर्त गावातच व्यतित केला. याठिकाणी आजही मराठी बोलणारे अनेक लोक आहेत.
दुसर्या बाजीराव पेशव्यांना कुठं ठेवायचं, हा इंग्रजासमोर प्रश्न होता. ते काही दिवस मथुरेत राहिले आणि गव्हर्नर जनरलच्या निर्णयानुसार त्यांना बिठूर उर्फ ब्रम्हवर्त गावात ठेवण्यात आलं. प्रभू रामचंद्र आणि सीतामाईचे सुपुत्र लव आणि कुश यांची जन्मभूमी असलेल्या बिठूर उर्फ ब्रह्मवर्त या गावाला तीर्थक्षैत्र म्हणून मोठं अध्यात्मिक महत्व आहे.
बाजीराव पेशवे परिवारासह बिठूर म्हणजे ब्रह्मवर्त या गावात आले. जवळपास साडेतीनशे 350 एकर जमिनीचा प्रदेश कँन्टोन्मेंट घोषित करुन पेशव्यांना तिथं वसविण्यात आलं. बाजीराव पेशव्यांना इंग्रजांनी वार्षिक 8 लाख रुपये इतकी मोठी रक्कम पेन्शन म्हणून मंजूर केली. आयुष्याचा सारा उत्तरार्ध पेशव्यांनी बिठूर म्हणजे ब्रह्मवर्त गावातच व्यतित केला.
या गावात रेल्वेस्टेशनजवळ एक त्यांच्यासाठी एक वाडा होता. पण पेशव्यांना तो लहान वाटला म्हणून त्यांनी दुसरा वाडा बांधला. हा वाडा कित्येक एकर जमिनीवर पसरलेला होता. त्या वाड्यात गालिचे, आरसे, हस्तीदंत, चीनी वस्तू यांनी तो वाडा सजविण्यात आला होता. त्या वाड्यात काचेची घुंगरं टांगलेली होती. पेशव्यांच्या पूर्वजांची चित्रं त्या भिंतीवर टांगली होती. आपल्या पुण्याच्या वाड्याच्या स्मरणार्थ त्यांनी त्या वाड्याला ‘शनिवार वाडा’ Shaniwarwada असं नाव दिलं होतं.
दुसर्या बाजीरावासह टोपे, सप्रे, मोघे, हार्डेकर अशी अनेक कुटूंबं या गावात येऊन वसली होती. या गावात पेशव्यांनी अनेक मदीरं बांधली होती. गंगेकिनारी घाट उभारले. पेशव्यांनी त्या गावात चांगलंच ऐश्वर्य थाटलं. इंग्रजाच्या तन्खाच्या म्हणजे पगाराचा पैसा हा असाच खर्चून टाकला.
दुसर्या बाजीराव पेशव्यांना एकच दु:ख होतं, ते म्हणजे पेशव्यांचा वारसा चालविण्यासाठी त्यांना मुलगा नव्हता. मुलगा व्हावा म्हणून त्यांनी 11 लग्नं केली. पण त्यांना दोन मुली झाल्या. अखेर त्यांनी एका मुलाला दत्तक घेतलं आणि त्याचं नाव ठेवलं नानासाहेब. दुसर्या बाजीराव पेशवे बिठूरमध्येच वारले. त्यांची समाधी तिथंच घाटावर उभारण्यात आली.
त्यांनी कधीच इंग्रजांविरुध्द उठाव केला नाही. मात्र या बिठूरच्या मातीतच भारतातल्या सगळ्यात मोठ्या स्वातंत्र्याचा रणसंग्रामाची बीजे रोवण्यात आली होती आणि हेच ते 1857 चं बंड ! बाजीराव पेशव्यांचे दत्तक पुत्र नानासाहेब पेशवे यांना पेशव्यांना मंजूर केलेली पेन्शन देण्यास इंग्रजांनी नकार दिला. त्यामुळे नानासाहेब पेशव्यांनी इंग्रजांविरुध्द युध्द पुकारण्याचं ठरवलं.
संपूर्ण भारतात कंपनी सरकारविरुध्द या ना त्या कारणामुळे असंतोष होता. वेगवेगळ्या संस्थानचे राजे बिठूरमध्ये एकत्र आले. त्यांनी उठावास सुरुवात केली. या सगळ्यात आघाडीवर होत्या, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई. त्यांचे वडील पेशव्यांच्या दरबारातले मानकरी होते.
लक्ष्मीबाई वाढल्यादेखील बिठूरमध्येच. नानासाहेब पेशवे, तात्या टोपे यांच्यासोबतच त्यांचं बालपण गेलं. इंग्रजांच्या विरोधात ते एकत्रच लढले. 1857 चा उठाव त्यांना जिंकता आला नाही, पण आपल्या मातीचा वारसा बिठूरच्या या सुपुत्रांनी चांगल्या प्रकारे जपला.
मधल्या काळात इंग्रजांनी नानासाहेब पेशवे यांच्यावर सूड म्हणून त्यांचे सर्व वाडे आणि मंदीरं पाडून टाकली. मात्र शनिवारवाड्यातल्या 7 विहीरी खजिन्याच्या अफवेमुळे वाचल्या. आजही विठूर आणि कानपूर परिसरात 2 हजारांच्या वर मराठी कुटुबं राहताहेत. यापैकी कित्येकांकडे तिथल्या जमिनीही आहेत.
गेल्या अनेक पिढ्यांपासून उत्तरप्रदेशाला ते आपली कर्मभूमी समजतात. मात्र तिथं जाऊनही ते आपली संस्कृती विसरलेले नाहीत. आजही तिथल्या अनेक घरांत मराठी बोललेलं ऐकायला येतं. कानपूर शहरात तर जवळपास 20 हजार मराठी कुटुंबं राहताहेत आणि तिथं गणेशोत्सव मोठ्या दणक्यात साजरे केले जाताहेत.
काही दिवसांपूर्वीच कानपूरला नाना राव पार्क उभारण्यात आलंय. या पार्कमध्ये नानासाहेब पेशवे, झाशीची राणी, तात्या टोपे अशा अनेक पराक्रमी विरांचे पुतळे उभे आहेत. आजही कानपूर, बिठूरमध्ये मराठ्यांच्या गाथा सांगितल्या जातात. हा लेख तुम्हाला कसा वाटला, ते ‘महासत्ता भारत’ला अवश्य कळवा हं!