सुनेला कोणासोबत तरी पळवून लावल्याच्या संशयातून एका व्यक्तीला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडलीय. त्याला वाचवण्यासाठी आलेल्या त्याच्या पत्नीलादेखील मारहाण करून तिचेही डोके फोडले आहे. याप्रकरणी आरोपींविरोधात वाळूंज एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारुती व्यंकट आईतवाड (वय-४० राहणार वडगाव कोल्हाटी वाळूज परिसर) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मारुती हे गेल्या काही वर्षांपासून वाळूज परिसरातील वडगाव कोल्हाटी या ठिकाणी कुटुंबीयांसोबत राहतात.
मारुती यांच्या शेजारी देविदास ताठे नामदेव ताठे यांचे कुटुंबीय राहते. या दोन्ही कुटुंबातील पूर्वीपासून संबंध चांगले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी ताठे कुटुंबातील सून घरात कुणालाच काही न सांगता निघून गेली. दरम्यान, या प्रकरणी नातेवाईकांनी शोध घेतला मात्र अद्याप शोध लागला नाही.
आपल्या सुनेला शेजारी राहणाऱ्या मारुती ऐतवाड यांनी इतर व्यक्तीसोबत पळून नेल्याचा संशय ताठे कुटुंबियांना होता. यामुळे मारुती यांच्याबद्दल ताठे कुटुंबियांच्या मनात राग होता. दरम्यान, शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास मारुती आईतवाड हे रस्त्याने जात असताना त्यांना शेजारी राहणारे देविदास ताठे राधाबाई ताठे आणि नामदेव ताठे यांनी अडवले.
यावेळी ‘तू आमच्या सुनेला फूस लावत कोणासोबत तरी पळून लावले आहे, असा आरोप केला. यावेळी मारुती यांनी मी असं काहीच केलं नाही, असं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला मात्र ताठे कुटुंबीय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हतं.
ताठे कुटुंबीयांनी मारुती याला बेदम मारहाण केली. ही घटना घराजवळ घडल्यामुळे पतीची आरड ओरड ऐकून मारुती यांची पत्नी धाव घेतली. वाद सोडवण्याचा प्रयत्न करत असताना मारुती यांच्या पत्नीलादेखील ताठे कुटुंबीयांनी मारहाण केली. यामध्ये मारुती यांच्या पत्नी रंजना यांच डोकं फुटलं.
या प्रकरणी मारुती व्यंकट आईतवाड यांनी तात्काळ पत्नीसह वाळुज एमआयडीसी पोलीस ठाणे गाठले. घडलेला घटनाक्रम पोलिसांना सांगितला. याप्रकरणी मारुती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ताठे कुटुंबियांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.