सिटीसर्व्हेच्या गलथान कारभारामुळे हवालदिल नागरिकांची पिळवणूक थांबवा – किरण काळे; वेळप्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

spot_img

सिटीसर्व्हेच्या गलथान कारभारामुळे हवालदिल नागरिकांची पिळवणूक थांबवा – किरण काळे;
वेळप्रसंगी महसूल मंत्री तथा पालकमंत्र्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा

प्रतिनिधी : सिटी सर्व्हे कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे नागरिकांचे आतोनात हाल होत आहेत. विशेषत: केडगाव उपनगरातील हजारो मालमत्ता धारकांची नावे प्रॉपर्टी कार्डवरून गायब झाली असून मालक हे मालक राहिलेले नाहीत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. हा गलथान कारभार आहे. जर नागरिकांची पिळवणूक महसूल विभागाच्या सिटी सर्व्हे कार्यालयाने थांबवली नाही, तर काँग्रेस आक्रमक होत रस्त्यावर उतरेल, असा इशारा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.

महसूल विभागाच्या पळवणुकीला कंटाळून संतप्त झालेल्या नागरिकांनी काँग्रेसशी संपर्क साधला होता. काळे यांनी गुरुवारी रात्री केडगाव परिसरात ठीक ठिकाणी भेटी देत नागरिकांशी चर्चा करत प्रश्न समजून घेतला होता. त्यानंतर शुक्रवारी काळे यांनी काँग्रेस कार्यालयात समस्याग्रस्त नागरिकांसह प्रसारमाध्यमांसमोर या गंभीर विषयाला वाचा फोडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी नागरिकांनी देखील आक्रमक होत अनेक समस्यांचा पाढाच माध्यम प्रतिनिधीं समोर वाचला.

यासंदर्भात महसूल मंत्री तथा पालकमंत्री, जिल्हाधिकारी, तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हा भूमी अधीक्षक अधिकारी यांना निवेदन देणार असल्याचे यावेळी काळे यांनी सांगितले. राज्याचे महसूल मंत्री हे जिल्ह्यातील आहेत. त्यांच्याच जिल्ह्यात ही दुरावस्था असून स्वकष्टाने कमावलेल्या मालमत्तेसाठी नागरिकांना प्रशासकीय यंत्रणेच्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याची सडकून टीका यावेळी त्यांनी पालकमंत्र्यांचे नाव न घेता केली.

पालकमंत्री कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा :
ज्या समस्याग्रस्त नागरिकांनी वेगवेगळ्या कामांसाठी कार्यालयाकडे अर्ज केले आहेत ती प्रकरणे पुढील 21 दिवसांच्या आत निकाली काढत त्यांना न्याय द्यावा. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पुढील तीन महिन्यात सर्व मालमत्ताधारकांच्या नोंदी अद्यावत करण्यात याव्यात. तातडीची प्रकरणे 21 दिवसात निकाली न काढल्यास काँग्रेससह कृती समिती आक्रमक होत रस्त्यावर उतरेल. महसूल मंत्री हेच जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यांचे आता नगर शहरात शासकीय कार्यालय देखील आहे. वेळप्रसंगी नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कार्यालया समोर काँग्रेसच्या वतीने उपोषणाला बसण्याचा इशारा काळे यांनी दिला आहे.

काय आहेत अडचणी ? :
– जानेवारी २०२२ पासून केडगावच्या तलाठी कार्यालयाने सातबारे उतारे देणे बंद केले आहे.
– सर्व रेकॉर्ड सिटी सर्व्हे कार्यालयास हस्तांतरित केले आहे.
– मात्र या कार्यालयाने कोणत्याच रेकॉर्डच्या नोंदी अद्यावत केलेल्या नाहीत.
– आज रोजी असणारे जमीन मालक हे रेकॉर्डला मालक म्हणून नोंदवले गेले नसून जुन्या मालकांची नावे दिसत आहेत. यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे

कोणकोणत्या अडचणी येत आहेत ? :
– वारस नोंद लागत नाही.
– सातबारा उतारे मिळत नाहीत.
– फेरफार मिळत नाहीत.
– जुने रेकॉर्ड, आदेशांच्या प्रति उपलब्ध होत नाहीत.
– मोजणी काम होत नाही.
– मोजणी नकाशे मिळत नाहीत.
– जमिनीच्या क्षेत्रातील दुरुस्ती आणि त्रुटी दूर होत नाहीत.
– टिपणी नकाशे, पोट हिस्से यांचे विषय प्रलंबित आहेत.

किती लोक बाधित ? :
– केडगाव मधील सर्व्हे क्रमांक 424 व 426 मधील सुमारे 186 खातेदार बाधित.
– यामध्ये सुमारे 800 ते 900 प्लॉट धारकांना अडचणी येत आहेत.

हेलपाट्यांचा विक्रम :
पत्रकार परिषदेत नागरिकांनी तक्रारींचा पाढा वाचताना कोणी शंभर ते सव्वाशे, कुणी 50 ते 60, कुणी 30 ते 40 हेलपाटे आतापर्यंत मारल्याची माहिती माध्यमांना दिली. प्रशासकीय अनास्थेमुळे शहरात हेलपाट्यांचा एक नवीन विक्रम झाल्याचे या निमित्ताने समोर आल आहे.

सबंध केडगाव बाधित, काँग्रेसचा दावा :
– तलाठी कार्यालयाने संपूर्ण केडगाव सिटी सर्व्हेकडे टप्प्याटप्प्याने हस्तांतरित केले आहे. त्यामुळे केडगाव मधील जवळपास सर्वच प्रॉपर्टी या कार्यालयाकडे आहेत. त्यामुळे हा केवळ 800 ते 900 प्लॉट धारकांचा विषय राहिला नसून यामुळे संपूर्ण केडगाव तसेच शहरातील अन्य भागातील नागरिक देखील बाधित झाल्याचा दावा काँग्रेसच्या वतीने काळे यांनी केला आहे. जे लोक गरजेमुळे कार्यालयात गेले म्हणून त्यांना ही अडचण समजली. मात्र अनेकांना आज रोजी या कार्यालयाकडून कागदाची आवश्यकता भासत नसल्यामुळे त्यांना प्रॉपर्टीकार्डवर आपण मालक असून देखील आपले नावच नाही याची कल्पनाच नसल्या ने ते पूर्णतः अंधारात असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे.

जमाबंदी आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली :
दि. 30 ऑगस्ट 2018 रोजी जमाबंदी आयुक्त, पुणे यांनी सिटी सर्व्हे कार्यालयाला प्रॉपर्टी कार्ड आणि सर्व नोंदी अद्यावत करण्यासंदर्भाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या होत्या. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचा आरोप काळे यांनी केला आहे.

नागरिक भयभीत :
मालक असून देखील तशी नोंद प्रॉपर्टी कार्ड नसल्यामुळे नागरिक भयभीत आहेत. अनेकांचे प्रत्यक्षात असणारे क्षेत्र नोंदींमध्ये कमी लावण्यात आल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. रेकॉर्ड विसंगतीमुळे मारामाऱ्या, अतिक्रमणे, बेकायदेशीर ताबे यामुळे फौजदारी स्वरूपांचे गुन्हे भविष्यात घडण्याची भीती यावेळी काळे यांनी व्यक्त केली. यामुळे नागरिक भयभीत झाल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यावेळी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मनोज गुंदेचा, माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, अल्पसंख्यांक काँग्रेसचे अनिस चुडीवाला, शहर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रवीण गीते, शहर जिल्हा महासचिव इम्रान बागवान, साफसफाई कामगार काँग्रेस विभाग शहर संघटक प्रशांत जाधव, संतोष जाधव, विद्यार्थी काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष किशोर कांबळे, कृती समितीचे सदस्य, समस्याग्रस्त नागरिक बाळासाहेब व्यवहारे, वसंत दराडे, शबनम पठाण, मंगलताई झिंजुर्डे, विकास दळवी, राजू शेख, आरिफ पठाण आदींसह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी नाशिक पदवीधर निवडणुकी संदर्भात पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना किरण काळे म्हणाले की, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी,महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या आदेशाचे पालन शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कडून केले जाईल. पक्ष शिस्तीचे उल्लंघन केले जाणार नाही. जिल्ह्याचे नेते आणि काँग्रेस कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आ. बाळासाहेब थोरात हे शस्त्रक्रियेमुळे मुंबईत रुग्णालयामध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क आमचा होऊ शकलेला नाही. मात्र आम्ही त्यांच्या लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करत आहोत. आ. थोरात साहेब हे आमचे नेते असून आ.थोरात, प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले यांच्या सूचनांचे पालन केले जाईल, असे काळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :