बापरे ! त्यानं आतापर्यंत चोरलं 400 कोटींचं ऑईल !
गुजरातसह देशातल्या अनेक राज्यांमध्ये असलेल्या तेल कंपनीच्या पाईपलाईन फोडून सुमारे 400 कोटी रुपयांचे ऑईल चोरणार्या संदीप गुप्ता याला पोलिसांनी अटक केली. सुरतच्या गुन्हे शाखेने आरोपी संदीप गुप्ता याला कोलकाता येथून अटक केलीय.
देशातल्या विविध राज्यांमध्ये तेल चोरीचे नेटवर्क चालविणारा माफिया संदीप गुप्ता याच्या अटकेनंतर या खेळाशी संबंधित अन्य लोकांचीही माहिती मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
राजस्थान, हरियाणा, गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये तेल चोरीचा सूत्रधार संदीप गुप्ताविरुद्ध २० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. संदीप गुप्ताविरुद्ध बिहारसह इतर अनेक राज्यांमध्ये तेल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. संदीप गुप्ताच्या अटकेबाबत सुरतचे पोलीस आयुक्त अजय कुमार तोमर म्हणाले की, संदीप गुप्ताविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. गुजरात आणि राजस्थान प्रकरणात अंतरिम जामीन घेऊन आरोपी फरार झाला होता. त्यानंतर सुरत गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती.
संदीप गुप्ता यानं दक्षिण गुजरातमध्ये फर्निश ऑइल खरेदी करून काळा धंदा सुरू केला. यानंतर तो तेल चोरांच्या संपर्कात आला. त्यानंतर, त्याने एक मोडस ऑपरेंडी तयार केली. ज्या अंतर्गत तो इंडियन ऑईल आणि ओएनजीसीची पाईपलाईन ज्या ठिकाणी असायच्या त्याच्याच जवळपास तो एखाद्या पत्र्याचा शेड भाड्याने घ्यायचा.
पत्र्याचा शेड भाड्याने घेतल्यानंतर संदीप गुप्ता आणि त्याच्या टोळीचे लोक पाईपलाईनला छेद देऊन तेल चोरून ते टँकरमध्ये भरत असत. चोरीच्या माध्यमातून तीन- चार टँकरमध्ये तेल चोरुन भरत होते.
गुजरात एटीएसनेही संदीप गुप्ताविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यात तो फरार होता. सुरत पोलिस आयुक्तांनी संदीप गुप्ता याला अटक करणे हे सुरत पोलिसांचं मोठे यश असल्याचं मानलं जात आहे.