शेतकरी बांधवांनो काळजी घ्या ! अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता !

spot_img

शेतकरी बांधवांनो काळजी घ्या ! अहमदनगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता !

भारतीय हवामान खात्‍याने जिल्‍ह्यात ७ ते ९ एप्रिल दरम्यान विजांच्‍या कडकडाटांसह वादळी वारा तसेच मध्‍यम स्‍वरुपाचा पाऊस होण्‍याची शक्‍यता वर्तविलेली आहे.

दरम्यान गुरुवारी (दि.६) जिल्ह्यात काही भागात वादळी वाऱ्यासह हलका पाऊस झाला. आता पुढील दोन दिवस नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.

मेघगर्जनेच्‍या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहु नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्‍यावा. धोकादायक ठिकाणी सेल्‍फी काढू नये. गडगडाटीच्‍या वादळादरम्‍यान व वीजा चमकतांना कोणत्‍याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्‍या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्‍टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्‍वजांचे खांब, विद्युत / दिव्‍यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉंन्‍सफॉर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्‍या अधांतरी लटकणा-या / लोंबणा-या केबल्‍स् पासून दूर रहावे.

वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्‍यास सुरक्षेसाठी गुडघ्‍यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्‍ही गुडघ्‍यांच्‍यामध्‍ये झाकावे. जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्‍ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्‍याप्रमाणे नियोजन केले असेल, तर या मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्‍यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतर करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

मदतीसाठी टोल फ्री क्रमांक

आपत्‍कालीन परिस्थितीत नजीकचे तहसील कार्यालय, पोलिस स्‍टेशन यांच्याशी संपर्क साधावा. जिल्‍हा नियंत्रण कक्षातील १०७७ या टोल फ्री क्रमांकावरही संपर्क साधून आपत्कालीन स्थितीबाबत माहिती देऊ शकता किंवा मदत मागू शकता. तसेच ०२४१-२३२३८४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :