शांत आहे पण ती माझी हतबलता समजू नका ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना गर्भित इशारा !

spot_img

शांत आहे पण ती माझी हतबलता समजू नका !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना गर्भित इशारा !

छोट्या छोट्या गोष्टींत तुमचं मन रमवू देऊ नका !

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांचा मुख्यमंत्री शिंदेंना सल्ला !

यापूर्वीच्या म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांच्या घरावर जेसीबी जायचे, त्यांच्या घराचं मोजमाप व्हायचं. अभिनेत्री कंगणा राणावतचं घर पाडायला एका वकिलाला 80 लाख रुपये दिले. हा अधिकार तुम्हाला कोणी दिला, असा प्रश्न विचारत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेच्या अखेरच्या दिवशी सभागृहात बोलताना त्या रुद्रावतार दाखवला.

नागपूरला विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात समारोपाच्या भाषणादरम्यान मुख्यमंत्री शिंदे यांनी, ‘मी शांत आहे, मात्र ती माझी हतबलता समजू नका’, असा गर्भित इशाराच विरोधकांना दिला. समारोपाच्या भाषणात त्यांनी उपस्थित मंत्री आणि आमदारांना एक शेर ऐकवला, ‘मैं शांत हूँ क्योंकि मैं सब जानता हूँ। लेकिन मैं जब बोलूंगा तो बात बहोत दूर तक जाएगी’, हा तो शेर होता.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, ‘त्यावेळच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून अमरावतीचे आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. केंद्रीय मत्री नारायण राणेंना त्यांच्या घरात जेवणाच्या ताटावरुन उठवून कोर्टात नेलं, 50 आमदारांनी बंड केलं म्हणून महिला आमदारांनाही त्यावेळी काहीही बोललं गेलं’.

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, ‘एवढं होऊनही विरोधी पक्षनेते अजित पवार आमच्या लोकांना निर्लज्ज वैगेरे बोलून मोकळे झाले. पण महिला आमदारांना काहीही बोलणार्‍यांचा अजित दादा, तुम्ही मात्र कधीही समाचार घेतला नाही.

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात बोलणार्‍यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. पण आमच्या विरोधात काहीही बोलणार्‍यांना आम्ही कधीही जेलमध्ये टाकलं नाही’.

दरम्यान, ‘ते’बेलमध्ये असले तरी काही लोकं कधीही जेलमध्ये जाऊ शकतात, अशी टिपण्णीही मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी बोलताना केली. त्यावेळी फडणवीस यांच्यासह आमच्या सर्वांच्या चौकशा लावल्या, त्यावेळी ही सत्तेची मस्ती नव्हती का, अशी विचारणा करत तुम्ही वैयक्तिक आपल्यावर घेऊ नका, असं मुख्यमंत्री शिंदे विरोधी पक्ष नेते अजित पवारांना म्हणाले.

ज्यांच्या पक्षाचा एक मंत्री दाऊदशी हातमिळवणी केल्यावरुन जेलमध्ये गेला, त्यांनी आम्हा कायदा आणि सुव्यवस्थेबद्दल ज्ञानाच्या गोष्टी सांगू नयेत, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

ते म्हणाले, ‘या महाराष्ट्रात छत्रपती शिवरायांनी बांधलेले 350 किल्ले आहेत. अनेक धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन स्थळं या महाराष्ट्रात आहेत. या सर्वांची देखभाल, दुरुस्ती करण्यासह आमचं सरकार महिलांना संरक्षण देणार आहे, तरुणांना रोजगार देणार आहे. महाराष्ट्राच्या या विकासाच्या प्रवासात आपण सारे सहप्रवाशी आहोत’.

दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे यांच्यानंतर बोलताना विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही मुख्यमंत्री शिंदे यांना छोट्या छोट्या गोष्टींत तुमचं मन रमवू देऊ नका, असा सल्ला दिला. सहा महिन्यांपूर्वी काय झालं, ते उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय.

विरोधी पक्ष या नात्यानं आम्ही जे प्रश्न उपस्थित केले, त्यावर बोलण्याऐवजी ज्यांना तुम्ही सोडून आलात, त्यांच्या वर्तमानपत्रात ते काय लिहिताहेत, हे तुम्ही या सभागृहात सांगत आहात, त्याच्याशी आमचा काय सबंध? तुम्हाला तरुण मुलं काही म्हणत असतील तर पोरं म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष करा ना’.

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांच्याशी तुमचे चांगले संबंध झाले, त्यांच्या महाराष्ट्राच्या भल्यासाठी आणखी काही आणता आलं तर आणा. महाराष्ट्रातली आणि देशातली महागाई कधी कमी होईल, यावर तुमच्या कामकाजाची दिशा ठरवा’.

एकंदरितच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार या दोघांच्या भाषणांनं अंतिम आठवड्याच्या कामकाजादरम्यान नागपूरच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभागृहात काहीसं गरमागरमीचं वातावरण झाल्याचं महाराष्ट्राच्या जनतेला पहायला मिळालं.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :