शनिशिंगणापूरला जगभरातल्या लाखो शनिभक्तांची गर्दी !

spot_img

शनिशिंगणापूरला जगभरातल्या लाखो शनिभक्तांची गर्दी !

या वर्षातली 2023 पहिलीच शनिअमावस्या आज (दि. 22) सकाळी सव्वा सहा वाजता सुरु झाली. शनिवारी आलेल्या शनी अमावस्येचा योग हा बर्‍याच वर्षांतून जुळून आलाय. मानवी जीवनातली दु:ख शनिदर्शनानं कमी होतात, अशी शनिभक्तांमध्ये श्रध्दा आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूरला जगभरातल्या लाखो भाविकांनी आज (दि. 22) गर्दी केली.

गेल्या तीन वर्षांत कोरोनाच्या सावटाखाली सर्व जग गेलं होतं. शनिशिंगणापूरचंही मंदीर या कोरोनामुळे बंद होतं. मात्र कोरोनाचं सावट नाहीसं झाल्यानंतर यावर्षी सुरुवातीलाच आलेल्या शनि अमावस्येनिमित्त भाविकांनी शनिदेवाच्या स्वयंभू शिळेचं मनोभावे दर्शन घेतलं.

शनिशिंगणापूरला शनि अमावस्येमुळे होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन इथल्या पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी चोख बंदोबस्त ठेवला. देवस्थानच्यावतीनं शनिभक्तांसाठी काही उपाय योजना करण्यात आल्या.

महाराष्ट्रात एकमेव असं शनिशिंगणापूर देवस्थान आहे. या देवस्थानचं वैशिष्ट असं आहे, की इथं घर आणि मंदीर आहेत, पण त्यांच्या दरवाजांना कडी कोयडा आणि कुलुपांचा वापर केला जत नाही. अक्षरश: बँका आणि पोलीस ठाण्यालाही कुलूप चावीचा वापर केला जात नाही.

इथं शनिदेवाची मूर्ती रुपात स्वयंभू शिळा आहे. पण त्या स्वयंभू शिळेला सावली चालत नाही, असं शिंगणापूरचे ग्रामस्थ सांगताहेत. एकदा या स्वयंभू शिळेवर लिंबाच्या झाडाची फांदी आली पण ती जळून गेल्याचंही स्थानिक ग्रामस्थ सांगतात.

दरम्यान, शनिदेव मानवी जीवनात प्रत्येकाच्या राशीत साडेसातीच्या रुपानं येतात. मात्र मनोभावे त्यांच्या स्वयंभू शिळेचं दर्शन घेतलं, तेल वाहिलं, शनिवारचा उपवास केला तर साडेसातीचा प्रभाव काहीसा कमी होतो, अशी शनिभक्तांची श्रध्दा आहे. त्यामुळेच शनिशिंगणापूरला आज लाखो शनिभक्तांची अलोट गर्दी झाली.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :