वडिलांचा मृ्त्यू, २ तासानंतर ११ वर्षाच्या लेकीनेही संपवल जीवन, बाप-लेकीवर एकाचवेळी अंत्यसंस्कार
भोपाळ: मध्य प्रदेशच्या अशोक नगरमध्ये हृदयद्रावक घटना घडली आहे.एका व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला.याची माहिती त्या व्यक्तीच्या ११ वर्षीय लेकीला समजताच तिनं विहिरीत उडी घेतली.शेजाऱ्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.मात्र तिचा मृत्यू झाला.त्यामुळं कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
अशोकनगर जिल्ह्यातील बरखेडा जागीरमध्ये ही घटना घडली.३६ वर्षीय रामबाबु धाकड यांना शुक्रवारी सकाळी हृदय विकाराचा झटका आला.रामबाबु शेती करायचे.शुक्रवारी सकाळी ते शेतावर गेले होते.थोड्याच वेळात ते घरी परतले.तेव्हा हृदयात तीव्र वेदना सुरू झाल्या.नातेवाईक आणि शेजारचे त्यांना घेऊन जवळच्या हाॅस्पिटलमध्ये घेऊन गेले.तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
रामबाबु यांच्या मृत्यूबद्दल समजताच कुटुंबाला मोठा धक्काचं बसला.रामबाबु यांची ११ वर्षीय मुलगी साधनाला वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही.तिनं घराबाहेर धाव घेत शेतात असलेल्या विहिरीत तिनं उडी टाकली.साधना धावत शेताकडे गेल्याचं समजताच नातेवाईक शेतात गेले.मात्र तिथे कोणीच नव्हतं.त्यावेळी काही लोकाचं लक्ष विहिरीजवळच्या चपलांकडे गेलं.विहिरीत डोकावुन पाहिलं असता आतमध्ये साधनाचा मृतदेह तरंगताना दिसला.ग्रामस्थांनी याची माहिती पोलिसांना दिली.२ तासांनंतर साधनाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.
रामबाबू यांना ३ मुली आणि १ मुलगा आहे.मुलगा सर्वात लहान आहे.११ वर्षांची साधना भावंडांमध्ये तिसऱ्या नंबरची होती.ती इयत्ता सातवीत शिकत होती.एकाच दिवशी दोघांचा मृत्यू झाल्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.दुपारी ४ सुमारास दोघांच्या पार्थिवावर एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.