लोकप्रतिनिधींनो! अहमदनगर शहराच्या पर्यटन विकासाचं मनावर घ्या; रसिक ग्रुपचे अध्यक्ष माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांचं आवाहन!
इतिहासाचा वारसा लाभलेलं, धार्मिक तीर्थस्थानांचं उत्तम नेटवर्क असलेलं 500 वर्षांपूर्वीच्या अहमदनगर शहराचं नाव बदलल्यासंदर्भात मध्यंतरी अनेकांनी राजकारण केलं. मात्र या शहरातल्या भोळ्या भाबड्या जनतेला हे राजकारण अजिबात पटलं नाही. या शहराचं नाव बदलण्याऐवजी या शहराचा ऐतिहासिक वारसा कशा पद्धतीने जतन करता येईल, हे राज्य आणि केंद्र सरकारमधल्या मंडळींनी लक्षात घ्यायला हवंय.
या पार्श्वभूमीवर अहमदनगर शहरात रसिक ग्रुपच्या माध्यमातून सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि पर्यटन अशा अनेक मुद्द्यांवर एक व्यापक अशी चळवळ हाती घेतलेले तत्कालीन नगरपालिकेचे माजी नगरसेवक जयंत येलूलकर यांच्याशी त्यांच्या निवासस्थानी ‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्कचे मुख्य संपादक बाळासाहेब शेटे पाटील यांनी चर्चा केली.
या प्रदीर्घ चर्चेत येलूलकर यांनी अहमदनगर शहराच्या प्रेमापोटी अनेक मुद्दे मोठ्या पोटतिडकीने मांडले. त्याचबरोबर राज्य आणि केंद्र सरकारकडून काही अपेक्षादेखील व्यक्त केल्या. पहा प्रत्यक्ष व्हिडिओ …
अहमदनगर शहर आणि जिल्हा राज्यात अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा अशी, या जिल्ह्याची ख्याती आहे. या जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला फक्त आवश्यकता आहे, ती लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची. ती जर असेल तर या शहरात पर्यटनाच्या माध्यमातून संधी निर्माण झाल्याशिवाय राहणार नाहीत.
जिल्ह्यातली कारखानदारी सांभाळणारे अनेक कारखानदार आणि शिक्षण सम्राट या अहमदनगर शहरात राहतात. मात्र ही सर्व कारभारी मंडळी आपापले गड किल्ले सांभाळण्यातच व्यस्त आहेत. नगर शहराच्या पर्यटनाच्या वाढीसाठी दुर्दैवाने आजपर्यंत कुठलेच प्रयत्न झालेले नाहीत. किंबहुना जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनदेखील याविषयी गांभीर्याने चर्चा झालेली नाही.
माजी नगरसेवक येलूलकर यांनी जी प्रामाणिकपणाची तळमळ व्यक्त केली आहे, तिला केंद्र आणि राज्य सरकार त्याचप्रमाणे या जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी कशाप्रकारे प्रतिसाद देतात, हे आता आगामी काही दिवसांमध्ये पाहायला मिळणार आहे.