आतापर्यंत अनेक खासगी हाॅस्पिटल्सच्या आवारात असलेल्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सक्ती केली जात होती. मात्र यापुढे अशी सक्ती करता येणार नाही. कारण राज्य सरकारनं दि. 9 डिसेंबर रोजी यासंदर्भातला एक अध्यादेश जारी केला आहे.
राज्य शासनाच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्यावतीनं विभागीय सह आयुक्त, सहाय्यक आयुक्त, औषध निरीक्षक यांच्या नावे जारी केलेल्या या अध्यादेशात अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत, की यापुढे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना संबंधित हाॅस्पिटल्सच्या आवारात असलेल्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती करण्यात येऊ नये.
विशेष म्हणजे अन्न आणि औषध प्रशासन विभागानं संबंधित खासगी हाॅस्पिटल्सच्या जबाबदार मंडळींना हा स्पष्ट आदेश दिला आहे, की ‘तुम्ही कोणत्याही परवानाधारक औषध विक्रेत्याकडून औषध खरेदी करु शकता’, असा फलक रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना दिसेल अशा प्रथमदर्शनी भागात लावण्यात यावा’.
या आदेशात पुढे म्हटले आहे, की हाॅस्पिटल्समध्ये असलेल्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना सक्ती केली असल्याच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्या तक्रारींच्या अनुषंगानं यापुढे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अशी सक्ती करता येणार नाही.
हाॅस्पिटल्सच्या मेडिकल्सवर आली ‘संक्रांत’ !महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी असलेल्या सुसज्ज बहुमजली खासगी हाॅस्पिटल्समध्ये त्या त्या हाॅस्पिटलच्या मालकीचे पण इतरांच्या नावावर मेडिकल्स चालवले जात आहे. या मेडिकल्समधील औषधांच्या किंमतीही प्रचंड महाग असतात. म्हणजे रुग्ण आणि त्याच्या नातेवाईकांना दोन्ही दोन्ही हातांनी आर्थिकदृष्ट्या लुटण्याचा गोरखधंदाच इथं सुरु होता. मात्र राज्यशासनाच्या आदेशानं खासगी हाॅस्पिटल्सच्या मेडिकल्सवर एकप्रकारे संक्रांत आली आहे.