रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटाचं परदेशातही ‘वेड’!
अख्ख्या बॉलिवूडला नाचवणाऱ्या रितेश देशमुखच्या मराठी ‘वेड’ चित्रपटाचं वेड परदेशातही जाऊन पोहोचलंय. वॉशिंग्टनमधील लोकप्रिय इन्स्टाग्राम इन्फ्लूएन्सर रिकी पाँडनंही वेड लावलंय या गाण्यावर डान्स केला आहे. रितेश, जिनिलिया आणि अजय-अतुल यांना टॅग करत त्याने हे रील शेअर केलंय.
एवढंच नव्हे चक्क मराठी ‘वेड लावलंय’ असं कॅप्शनही दिलं आहे. विविध भारतीय गाण्यावर रील बनवण्यासाठी रिकी प्रसिद्ध आहे. आता एका मराठमोळ्या गाण्यावर तो थिरकताना दिसला. त्याच्या या व्हिडिओवर अनेक भारतीयांनी कमेंट करत रितेशचे कौतूक केलंय.
अभिनेता रितेश देशमुख सध्या त्याच्या ‘वेड’ या आगामी सिनेमामुळे विशेष चर्चेत आला आहे. अजय-अतुलचे संगीत असणाऱ्या या सिनेमातल्या गाण्यांनी तर प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावले आहे. सलमान खान आणि रितेश देशमुख यांच्यावर चित्रीत झालेलं या सिनेमातील ‘वेड लावलंय’ हे गाणं सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
‘वेड लावलंय’ची हूक स्टेप करत अनेकांनी रील्स शेअर केली आहे. स्वत: रितेशने बॉलिवूडमधील विविध सेलिब्रिटींसोबत या गाण्यावर रील बनवले आहे. रितेश-जिनिलियानंही या गाण्यावर रील शेअर केलंय.
दरम्यान, रितेशने या गाण्यावर अभिनेता संजय दत्त, अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, विकी कौशल, अनिल कपूर, सलमान खान, अभिनेत्री अनन्या पांडे, निर्माता-फिल्ममेकर करण जोहर या कलाकारांसोबत ‘वेड लावलंय’ गाण्यावर डान्स केलाय. रितेशच्या या गाण्याप्रमाणेच हे रील्सही सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.