रिक्षाचालकांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ! 

spot_img

रिक्षाचालकांना लुटणाऱ्या तिघांना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ! 

गुजरातमधून येऊन मुंबई, ठाणे, मीरा रोडमध्ये रिक्षाचालकांना गुंगीचे औषध देऊन लुटणाऱ्या सराईत त्रिकुटास मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्या तिघांनी मुंबई, ठाणे, मीरा रोड भागात आठ रिक्षाचालकांना लुटल्याचे उघड झाले आहे. त्यांच्याकडून पाच लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

मीरा रोडच्या नयानगर व काशिमीरा पोलिस ठाणे हद्दीत रिक्षाचालकांना गुंगीचे औषध देऊन लुटण्याचे तीन गुन्हे घडले हाेते. आरोपी हे बोरिवलीतून मीरा रोडच्या एखाद्या देवळात दर्शनाच्या बहाण्याने यायचे. तेथे रिक्षाचालकास प्रसादाचा पेढा वा थंडपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, रोख रक्कम लुटून पळून जायचे.

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष १ चे पोलिस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक निरीक्षक पुष्पराज सुर्वे यांच्यासह संजय पाटील, राजू तांबे, संजय शिंदे, किशोर वाडीले, अविनाश गर्जे, विकास राजपूत, सचिन सावंत, प्रशांत विसपुते, समीर यादव, प्रफुल्ल पाटील, सायबर शाखेचे संतोष चव्हाण यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच अन्य भागातील गुन्ह्यांचा आढावा घेऊन तपास सुरू केला होता.

पोलिसांनी सुरत येथून सागर महेंद्रभाई पारेख याला आधी पकडले. त्याच्या चौकशीत संपतराज ऊर्फ संपो गेवेरचंद (गेवरचंद) जैन आणि सुभाष अरविंद पाटील (रा. अहमदाबाद) या आरोपींची नावे उघड झाली. दाेघेही मीरा रोडमध्ये सावज शोधत असतानाच पोलिसांनी त्यांना बेड्या ठाेकल्या. आरोपींनी मुंबईच्या वांद्रे व आंबोली तसेच ठाण्याच्या खडकपाडा पोलिस ठाणे हद्दीतही असे गुन्हे केले आहेत.

गुजरातवरून ट्रेन, बसने ये-जा

गुजरातवरून ट्रेन वा बसने आराेपी येत. दादर व मीरा रोड भागात लॉजमध्ये राहायचे आणि लूटमार करून पुन्हा गुजरातमध्ये पळून जायचे. संपत जैन याच्यावर अहमदाबाद, बडोदासह गुजरातमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. गुजरातमध्ये जैन हा रेकाॅर्डवर असल्याने त्याने साथीदारांसह महाराष्ट्रातील पश्चिम पट्टा लुटमारीसाठी निवडला होता.

मीरा रोडच्या नयानगर आणि काशिमीरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रिक्षाचालकांना संबंधित टोळके गाठायचे. त्यांच्याशी ओळख वाढवायचे, त्यांचा विश्वास संपादन करायचे. तसेच त्यांना गुंगीचे औषध देऊन गळ्यातील सोनसाखळी, रोख रक्कम लुटून पळून जायचे. या सराईत गुन्हेगार त्रिकुटाला मीरा-भाईंदर-वसई विरार पोलिसांनी अखेर गजाआड केले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :