राज्यातल्या 3 हजार 594 मुली बेपत्ता ; शिंदे फडणवीस सरकारचे धाबे दणाणले !

spot_img

राज्यातल्या 3 हजार 594 मुली बेपत्ता ; शिंदे फडणवीस सरकारचे धाबे दणाणले !

राज्यात एकीकडे राजकीय वातावरण तापलं असतानाच दुसरीकडे एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागील तीन महिन्यांत महाराष्ट्रातून 16 ते 25 वयोगटातील 3 हजार 594 तरुणी राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली असून शिंदे फडणवीस सरकारचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

मुलींच्या बेपत्ता होण्यावरुन आता राज्य महिला आयोग आक्रमक झालं आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मुली बेपत्ता होण्याच्या धक्कादायक आकडेवारीवरुन शिंदे फडणवीस सरकारवर निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं, असं चाकणकरांनी म्हटलं आहे. तसेच वेबसाईटवर असलेली महिला आणि मुली बेपत्ता होण्याची आकडेवारी चिंताजनक असल्याचं नमूद केलं.

राज्य सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, मात्र या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही. पण राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी अशी विनंती आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या.

याचवेळी त्यांनी महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहिम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर यांनी केली आहे.

राज्यात 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान 3 हजार 594 महिला बेपत्ता आहेत, यातील काहींचा शोध लागला असला तरी एकंदरीतच ही गंभीर बाब असल्याचं मत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलं आहे. नोकरी, लग्न, प्रेमाचं आमिष दाखवून मुलींची दिशाभूल करुन त्यांचं लैंगिक शोषण केलं जात असल्याचंही समोर आलं आहे. राजकारण सोडून राज्य सरकारने आधी मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं, असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :