मुली व महिलांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव.

spot_img

मुली व महिलांची छेड काढणाऱ्यांची गय केली जाणार नाही ; पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव.

मोठ्या संख्येने उपस्थिती

मुलींना निर्भयपणे शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेता यावे. तसेच, सार्वजनिक ठिकाणी महिलांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी कोतवाली पोलिसांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. शुक्रवारी (ता.१९) कोतवाली पोलीस ठाण्यात शहरातील प्रमुख महिलांची बैठक बोलाविण्यात आली होती. या बैठकीत महिला तसेच मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी टाळता आल्या पाहिजेत, यावर पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मार्गदर्शन केले.

महिला व मुलींनी निर्भय होणे गरजेचे आहे, कोणाचाही त्रास सहन न करता अन्यायाविरुद्ध महिला तसेच मुलींनी आवाज उठवावा.. कोतवाली पोलीस तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील, असा विश्वास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी उपस्थित महिलांना दिला. महिला व मुलींना कोणताही त्रास असल्यास त्यांनी मनात कोणतीही भीती न बाळगता पोलीस ठाण्यात येऊन संबंधिताची तक्रार द्यावी.

महिलांना पोलीस ठाणे म्हणजे आपले स्वतःचे हक्काचे माहेरघर वाटावं यासाठी विविध उपाय योजना पोलिसांकडून करण्यात येत असल्याचे निरीक्षक यादव म्हणाले. मुलींना कोणत्या ना कोणत्या त्रासाला सामोरे जावे लागते. बसमध्ये शेजारी बसणारे असोत की रस्त्याने जाताना-येताना वेगळ्या नजरेने पाहणारे असोत किंवा वारंवार पाठलाग करून मोबाईल नंबर घेऊन मेसेज करणारे असोत, अशा प्रकारचा त्रास महिला-मुलींना सहन करावा लागतो. परंतु, बदनामीच्या भीतीपोटी मुली तसेच महिला अशा प्रकाराची कुठेही वाच्यता करत नाहीत. याचाच फायदा घेऊन समोरील व्यक्तीची हिम्मत वाढते आणि नको तो अनुचित प्रकार घडतो. त्यामुळे अशा गोष्टींना न घाबरता मुली आणि महिलांनी तक्रार केली पाहिजे. तक्रार करणाऱ्या महिलेचे अथवा मुलीचे नाव पोलिसांकडून गोपनीय ठेवण्यात येणार असल्याचे यादव यांनी सांगितले.

ते म्हणाले, चांगले शिक्षण घेऊन करिअर घडवण्याच्या वयात तरुण पिढी प्रेम, आकर्षण या बाबींकडे वळते. विशेषता मुली वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडतात. बऱ्याच प्रकरणात मुलींना फोटो, व्हिडिओ दाखवून त्रास दिला जातो. त्यामुळे मुलींनी वेळीच सावध झाले पाहिजे. असा गैरफायदा घेऊन कोणी त्रास देत असेल तरीही तक्रार करा पोलिसांकडून मदत करण्यात येईल.

कोणतीही अडचण असो, कधीही पोलीस ठाण्यात या तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सर्वतोपरी मदत पोलिसांकडून केली जाईल, असा विश्वास पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी यावेळी उपस्थित महिलांना दिला. पहिल्यांदाच महिलांना पोलिस ठाण्यात बोलावून अशा प्रकारे मार्गदर्शन केल्याने कोतवाली पोलिसांच्या या उपक्रमाचे उपस्थित महिलांनी कौतूक केले.

पालकांनी आपल्या मुला-मुलींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत यावेळी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी व्यक्त केले. मुलांच्या मित्र-मैत्रिणीची ओळख पालकांना असली पाहिजे. त्यासोबतच मुलांच्या शाळा कॉलेजलाही पालकांनी अधून मधून भेट देणे आवश्यक आहे.

मुलींना त्रास देणाऱ्या रोड रोमियोंचा बंदोबस्त तर पोलिसांकडून केला जाईलच. परंतु, काही प्रवृत्ती आपल्या पदाचा दुरुपयोग करून महिला किंवा मुलींना त्रास देत असतील तर अशांची नावे पोलिसांना द्या. त्रास देणाऱ्यांची नावे पोलिसांकडे आल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, यादव असे म्हणाले.

या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलीस जवान सुरेश गर्गे, बाळासाहेब खामकर, अभय कदम, उमेश शेरकर यांनी केले होते.

कार्यक्रमासाठी पोलिसांच्या आवाहनावरून अनुराधा येवले, नलिनी गायकवाड, रजनी ताठे, लता गांधी, शारदा होसिंग, आशा गायकवाड, अनिता एडके, भारती शिंदे, इंदिरा तिवारी, देवी आरगुंडा, राणी काशीवाल गौतमी भिंगारदिवे, शोभा गाडे, राणी काशीवाल, हिरा भिंगारदिवे, रंजना भिंगारदिवे, सिंधुताई कटके ,जरीना पठाण, सुनीता बागडे, उज्वला पारदे, प्रिया गायकवाड, सारिका गायकवाड, सविता कोटा, रोहिणी कोडम, कविता काळे, मधुरा जायरे, प्रिया गायकवाड, सारून गायकवाड सविता कोटा, नीलमणी गांधी, स्नेहा जोशी, आरती आढाव, प्रणाली कडूस, सुरेखा पाटील, अश्विनी वाळुंजकर, रोहिणी पुंडलिक, प्रिया जानवे, शोभा भालसिंग, स्वाती जाधव, सुनिता बागडे, अरुणा गोयल, सविता पालवे, शोभा गाडे या व इतर महिला भगिनी उपस्थित होत्या.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :