एक तक्रारदार आणि त्याचे काही नातेवाईक मारहाणीच्या गुन्ह्यात अडकले होते. त्या सर्वांना सदरील गुन्ह्यात जामीन मिळावा, यासाठी एका पोलीस कर्मचाऱ्यांने तक्रारदाराकडून तब्बल चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारली आणि अडकला अँटी करप्शनच्या ट्रॅपमध्ये. हर्षवर्धन हरिश्चंद्र वाघमोडे असे या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे.
हा पोलीस कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी पोलीस ठाण्यात नेमणुकीला होता. तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांविरुध्द बार्शी पोलीस ठाण्यात आयपीसी 143, 147, 148, 149, 324, 327, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातून तात्काळ जामीन मिळावा, यासाठी पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारदाराकडे पन्नास हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली.
दरम्यान, तडजोडीअंती या पोलीस कर्मचाऱ्याला तक्रारदाराने चाळीस हजार रुपये देण्याचे मान्य केलं. हे चाळीस हजार रुपये घेताना सदर पोलीस कर्मचाऱ्याला अँटी करप्शनच्या पथकाने ताब्यात घेतले. या पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिथं होता रुबाब, तिथेच झाला आरोपी !
हर्षवर्धन वाघमोडे हा पोलीस कर्मचारी सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी पोलीस ठाण्यात नेमणूकीला होता. ड्युटीवर असताना या पोलीस कर्मचाऱ्याचा भलताच रुबाब होता. किरकोळ स्वरूपातल्या गुन्ह्यात अडकलेल्या आरोपींवर हा पोलीस दादा प्रचंड असा रुबाब करायचा. मात्र जिथे त्याचा रुबाब होता, त्याच पोलीस ठाण्यात त्याला आरोपी म्हणून बसावं लागलं. सोलापूर पोलीस दलासाठी ही मोठी दुर्दैवाची आणि लांछनास्पद अशी बाब आहे.
आमच्या जास्तीत जास्त बातम्या वाचण्यासाठी ‘महासत्ता भारत’ हे फेसबुक पेज लाईक करा…