भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी १८९ कैद्यांना विशेष माफी देऊन त्यांची कारागृहातून सुटका करण्यात येणार आहे. याबाबत राज्य सरकारने आदेश पारित केले आहेत. त्यानुसार कैद्यांची कारागृहातून मुक्तता करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.
भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त कारागृहातील शिक्षा भोगत असलेल्या परंतु चांगली वर्तणूक आणि इतर निकषांनुसार पात्र कैद्यांना विशेष माफी देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्र्यालयामार्फत घेण्यात आला होता. त्यानुसार मागील १५ ऑगस्ट रोजी राज्यातील २०४ कैद्यांची मुक्तता करण्यात आली होती. येत्या २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनी १८९ कैद्यांची सुटका करण्यात येणार आहे. तसेच, यापुढे १५ ऑगस्ट २०२३ रोजी काही कैद्यांची सुटका करण्याचा प्रस्ताव आहे.
दरम्यान, गंभीर गुन्ह्यात दोषी असलेल्या कैद्यांची कारागृहातून सुटका करण्यात येणार नाही. कारागृहात शिस्त आणि चांगली वर्तणूक ठेवणाऱ्या कैद्यांची सुटका करून त्यांनी देशाचे जबाबदार नागरिक व्हावे, यासाठी ही संधी देण्यात येत आहे. कारागृहातून बाहेर पडलेल्या कैद्यांचे समाजात पुनर्वसन करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक (कारागृह व सुधारसेवा) अमिताभ गुप्ता यांनी दिली.
– चांगली वर्तणूक आणि शिक्षेचा कालावधी ५० टक्के पूर्ण असणे अनिवार्य
– ५० वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिला आणि तृतीयपंथी कैदी
– ६० वर्षांपेक्षा अधिक वयाचे पुरूष कैदी
– ७० टक्क्यांपेक्षा अधिक दिव्यांग कैदी
– गंभीर आजाराने त्रस्त कैदी
– गरिबीमुळे दंडाची रक्कम भरण्यास असमर्थ असलेले कैदी