भाजप आणि ठाकरे भविष्यात एकत्र येतील का ; भाजपच्या ‘या’ नेत्याने व्यक्त केली शंका !

spot_img

भाजप आणि ठाकरे भविष्यात एकत्र येतील का ; भाजपच्या ‘या’ नेत्याने व्यक्त केली शंका !

विश्वासघाताचं राजकारण उद्धव ठाकरेंकडून झाले असून भाजपात विश्वासघाती राजकारणाला अजिबात थारा नाही, असे थेट मत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (BJP state president Chandrasekhar Bawankule) यांनी व्यक्त केलंय. भाजप आणि ठाकरे पुन्हा एकत्र येतील का, यावरही त्यांनी शंका व्यक्त केली आहे. अहमदनगर जिल्ह्यातल्या शिर्डी येथे संघटनात्मक दौऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

बावनकुळे म्हणाले, जाहीर सभेत एखाद्या विषयाला घेऊन टिका केल्यास त्यावर हरकत नाही. आम्ही कुणावर व्यक्तीगत टिका करत नाही. जाणीवपूर्वक व्यक्तीगत टिका टिप्पणी योग्य नाही. शरद पवार व अजित पवार सरकारवर टीका करीत असतात, तो त्यांचा अधिकार आहे. मात्र २०२४ मध्ये भाजपा आणि शिवसेनेचे काम बघून अनेकजण इकडे आमच्याकडे उड्या मारतील. उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळी अर्थसंकल्प वाचत होते, तेंव्हा विरोधकांचे चेहरे लहान झाले होते. यापुढचा २०२४-२५ चा अर्थसंकल्प वाचताना विरोधक भाजपाकडेच येतील, असा विश्वास मला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी दौऱ्यावर असून ते पदाधिकारी बैठक आणि बूथ बैठक, मोटारसायकल रॅलीसह सामाजिक बैठक व धन्यवाद मोदीजी या कार्यक्रमात सामील झाले होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अयोध्या दौऱ्यावरून सुरु असलेल्या चर्चेबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात बावनकुळे म्हणाले, अयोध्येच्या दर्शनाला उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा जातात. भव्य राममंदीर बनावे, हे देशातील प्रत्येकाची इच्छा आहे.

प्रभू रामचंद्र आराध्य दैवत असून त्यांच्या दर्शनाला जाण्याचा अधिकार सर्वांचा असून त्यावर टिका करू नये.

काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनीदेखील दर्शनाला जाणार असे सांगितले. तेव्हा टिका केली का, असा सवाल बावनकुळे यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘निवडणूक लढवण्यासाठी कोणतीही डिग्री असण्याचा कायदा नाही. वस्तुस्थिती न स्विकारता केवळ टिका केली जाते. तुम्ही विकास झाला पाहिजे, यासाठी टिका करा. राज्यात आणि देशातील प्रश्नांबाबत आंदोलन करा. अनेक विषय सरकारपुढे विरोधकांनी मांडावेत. मात्र महाराष्ट्र यापासून दूर जातो.

जनतेच्या मनात नकारात्मक विचार पेरले जात आहेत. यातून आपण बाहेर निघायला पाहिजे. विरोधी पक्षाने महाराष्ट्राचे प्रश्न सरकारपुढे मांडायची गरज असून चुकीच्या गोष्टीवर बोलायला हरकत नाही, असेही भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :