भाजपच्या गोटात प्रचंड हालचाली ; राष्ट्रवादीला पडणार मोठं खिंडार !
राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पडण्याची शक्यता आहे. ईडीच्या रडावर असलेल्या काही नेत्यांना भाजप गळाला लावणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यासाठी भाजपच्या गोटात जोरदार हालचालींनासुद्धा सुरूवात झाली असल्याची माहिती आहे.
विशेष म्हणजे, या नेत्यांमध्ये अजित पवार यांचा समावेश नसून हा राष्ट्रवादीचा दुसरा गट असल्याची माहिती आहे. या गटामधील ज्येष्ठ नेत्यांची एक मोठी फळी भाजपसोबत जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये बहुतांश नेते हे ईडीच्या रडावरील असल्याची माहिती आहे. या नेत्यांकडून भाजपला ग्रीन सिग्नलसुद्धा दिला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
यामध्ये मंत्रिपदे भोगलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे. गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार होणाऱ्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडींमुळे राष्ट्रवादीच्या गटात अस्वस्थता पसरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये अजित पवार नाराज असल्याचा चर्चांनादेखील उधाण आलं होतं. यातच आता राष्ट्रवादीचे थेट १० नेते भाजपच्या वाटेवर आहेत. यातील बहुतांश नेते हे पश्चिम महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. अजित पवार हे लवकरच भाजपसोबत जाणार, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. आज या चर्चांनी अधिकच जोर धरला होता. कारण, अजित पवार यांनी आपला सासवड दौरा तातडीने रद्द केला होता. मात्र, अजित पवार यांनी वेगवेगळ्या राजकीय चर्चांना ट्विट करत पूर्णविराम दिलाय.
दरम्यान, ‘मी खारघर (नवी मुंबई) येथे रविवारी झालेल्या ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांच्या कुटुंबियांना आणि उष्माघातामुळे बाधित झालेल्या श्रीसदस्यांना भेट देऊन त्यांना धीर देण्यासाठी ‘एमजीएम’ हॉस्पिटलमध्ये सोमवारी पहाटेपर्यंत उपस्थित होतो. सोमवारी माझा कोणताही नियोजित कार्यक्रम नव्हता, मी मुंबईतच आहे’, असं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.