ट्रेड एक्स डॉट कॉम या वेबसाईटमध्ये गुंतवणूक केल्यास भरघोस असा रिफंड म्हणजे परतावा देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची एक कोटी बारा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पुणे जिल्ह्यातल्या वडगाव शेरी गावच्या एका 46 वर्षीय इसमाने फिर्याद दिली. पोलिसांनी या फिर्यादीनुसार डॅनियल कूपर अलेक्झांडर, हुडहेटर याच्यासह अन्य दोघा मोबाईलधारकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीनल सुपे पाटील या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
आरोपींनी फिर्यादीशी संपर्क साधून त्याच्याकडून एक कोटी बारा लाख 60 हजार रुपयांचे २.७९६३६६ इतके बिटकॉइन्स स्विकारले. ‘आम्ही ट्रेड एक्स डॉट कॉम या संस्थेमधून बोलत आहोत. तुम्ही जर आमच्या संस्थेत गुंतवणूक केली तर तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे भरघोस स्वरूपाचा परतावा मिळेल, असं आरोपींनी फिर्यादीला आमिष दाखवलं आणि त्या आमिषाला बळी पडून फिर्यादीने ही गुंतवणूक केली.
समाजात फसवणुकीचे अनेक प्रकार हाताळले जात आहेत. दररोज कोणाची ना कोणाची फसवणूक होत आहे. आतापर्यंत लाखो लोकांची विविध प्रकारच्या आमिषांद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे. मात्र तरीदेखील यातून कोणीही बोध घ्यायला तयार नाही. सायबर क्राईम पोलीस वारंवार नागरिकांना आवाहन करतात, की अशा आमिषांना बळी पडू नका. मात्र नागरिक याचा कुठलाही गांभीर्याने विचार करताना दिसत नाहीत.