सोनई – राज्यभर प्रसिद्ध असलेला घोडेगाव येथे जनावरांचा बाजार आहे. राज्यांचा बाहेरुन ही येथे जनावरे विक्री साठी आणलें जातात मात्र गेल्या चौदा आठवड्या पासुन लंपी आजारामुळे कागदोपत्री बाजार बंद असल्याचे सांगितले जाते.
मात्र स्थानिक व बाहेरील व्यापारी यांनी आधीच घोडेगाव आसपासच्या भागात गोठे खरेदी केलेले आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चढ्या भावाने जनावरांची खरेदी विक्री होत असल्याने व्यापारी व दलाल मालामाल झाले आहेत.
प्रशासन यावर कुठलीही कारवाई करताना दिसून येत नाही. याचाच फायदा ठराविक व्यापारी आणि ज्यांचा गोठा घोडेगावचा आसपासच्या परिसरात आहे त्यांना होत आहे.
दर आठवड्याला लाखों रुपयांची उलाढाल या ठिकाणी होत असताना पोलीस, महसुल व कृषी विभाग मात्र एकमेकांकडे बोट दाखवून ही जबाबदारी आमची नसल्याचे सांगत आपली जबाबदारी झटकत आहे. जर महसूल विभाग, कृषी विभाग, स्थानीक ग्रामपंचायत यांची जबाबदारी नाही तर मग कुणाची जबाबदारी आहे. असा प्रश्न निर्माण होत आहे.
सदरील बाजार हा झापवाडी हद्दीत येत आहे. त्या गावातील ग्रामपंचायत सरपंचाशी संपर्क साधला असता आम्ही सोनई पोलीस स्टेशनला तसे लेखी पत्र दिले असल्याचे सरपंच सोमनाथ कदम यांनी सांगितले. दिवसेंदिवस परिसरात लंपीचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे.
शेतकऱ्यांकडून कवडी मोलाने घेतलेले जनावर व्यापाऱ्यांकडून चढ्या भावाने विकले जाते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी नुकसान शेतकऱ्याचेच आहे. व्यापाऱ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार चालू असल्याची चर्चा जनतेतून ऐकावयास मिळते.
दर शुक्रवारी झापवाडी रस्त्याला एक ते दीड किलोमीटर रस्त्याच्या कडेला फक्त व्यापाऱ्यांचा बाजार थाटलेला दिसून येतो.
मात्र याचा पुढील धोका लक्षांत घेता संबंधित व्यापारी व गोठा चालका विरुद्ध कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. अन्यथा यांचे परिणाम भयंकर होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.