अहमदनगर जिल्ह्यातल्या नगर – पाथर्डी – नांदेड निर्मल महामार्ग, नगर – राहुरी – शिर्डी – कोपरगाव रस्ता आणि नगर – मिरजगाव – चापडगाव – करमाळा – टेंभूर्णी महामार्ग या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी आणि नूतनीकरणाच्या मागणीसाठी नगर – पारनेर मतदारसंघाचे आमदार निलेश लंके यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चार दिवस उपोषण आंदोलन केलं. त्यांच्या उपोषधाची सांगता राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत शनिवारी दुपारी झाली.
यावेळी आमदार लंके यांनी जे वक्तव्य केलं, त्या वक्तव्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा एकदा नग दक्षिण आणि उत्तरेचा संघर्ष पेटल्याचं दृष्टिपथात येतं. नगर दक्षिण आणि नगर उत्तर मतदारसंघात यापूर्वीही अनेकवेळा संघर्ष झाल्याचं पहायला मिळालंय.
मात्र सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष जनतेचं मनोरंजन करणारा ठरायचा. सध्याच्या परिस्थितीत नगर जिल्ह्यात कुठल्या सार्वत्रिक निवडणूका जाहीर झालेल्या नसल्या तरी हा संघर्ष पेटल्याचं दिसतंय. यासाठी आमदार निलेश लंके यांचं उपोषण हे एकच कारण पुरेसं आहे. माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते लिंबू पाणी घेऊन आमदार लंके यांचं उपोषण सुटलं.
त्यावेळी उत्साही कार्यकर्त्यांनी त्यांना खांद्यावर उचलून घेत मिरवणूकही काढली. त्यावेळी आमदार लंके यांनी छोटंसं भाषण केलं. चार दिवसांच्या उपोषणामुळं तीन किलो वजन घटलं तरी आमदार लंके यांनी केलेल्या या छोट्याशा भाषणात सत्ताधार्यांना खूप मोठा संदेश दिला. ‘ये तो सिर्फ झाँकी हैं, पुरी फिल्म अभी बाकी हैं’, असाच काहीसा मतितार्थ आमदार लंके यांच्या या भाषणाचा होता.
नगर दक्षिण मतदारसंघाचे विद्यमान खासदार डाॅ. सुजय विखे यांनाच उद्देशून पण त्यांचा नामोल्लेख टाळून केलेल्या भाषणात आमदार लंके यांनी ठेकेदाराला टक्केवारीच्या आरोपावरुन मी राजीनामा देतो, तसा तुम्हीही द्या, असं जाहीर आव्हानच देऊन टाकलं.
लोकसभेच्या संभाव्य उमेदवारीवरुन आमदार लंके यांच्या संबंधा जी चर्चा झाली, त्या चर्चेलाही आ. लंके यांनी पूर्णविराम दिला. ते म्हणाले, ‘त्यांनी धास्ती घेतलीय, हा लोकसभेला उभा राहतो की काय.
पण त्या निवडणुकीपूर्वी पुलाखालून खूप पाणी वाहून जाणार आहे. त्यामुळे आमच्या उपोषण आंदोलनासाठी आरोग्य पथकही त्यांनी पाठवलं नाही. जे पथक आले, त्यांना तेथे का गेला, अशी विचारणाही करण्यात आली’. रस्त्याच्या कामाचं नाही पण त्यांनी मला मारायचं तर टेंडर दिलं नाही ना, अशी विचारणा आमदार लंके यांनी यावेळी बोलताना केली.
कोणीही भेटायला आलं नाही, अधिकार्यांनाही भेटायला येऊ दिलं नाही. सत्तेचा दुरुपयोग त्यांनी चालवलाय.
दरम्यान, यावेळी अॅड. प्रताप ढाकणे यांनी नामोल्लेख टाळून मनातली खदखद ओठांवर आणली. ते म्हणाले, नगर जिल्ह्याच्या विकासासाठी येणार्या निधींतून रुपयातल्या 70 पैशांचा खर्च या जिल्ह्याच्या उत्तरेतच केला जातो.
नगर दक्षिणच्या वाट्याला नेहमी हालअपेष्टा येते. या भागात रुपयातले फक्त 30 पैसे कसे बसे खर्च केले जातात. हा दुजाभाव टाळण्यासाठी स्वतंत्र दक्षिण नगर जिल्ह्याची निर्मिती करा, अशी मागणी अॅड. ढाकणे यांनी केली.
एकंदरितच, आमदार निलेश लंके यांच्या चार दिवसांच्या उपोषणामुळे नगर दक्षिण आणि उत्तरेत असंतोष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला.
हा संघर्ष भविष्यात तीव्र होऊन नगर दक्षिण जिल्हा अस्तित्वात येईल का, जिल्ह्याचं विभाजन होणार का, आमदार लंकेंना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होणार का, या अशा अनेक प्रश्नांच्या उत्तराची तमाम नगरकरांना अपेक्षा लागली आहे.