नवर्याला बाहेरचा नाद लागलाय, बाबा मी काय करु? नगरमध्ये मांत्रिकांनी दिलेली पावडर पतीला खाऊ घातल्यावर विचीत्रचं घडलं
अहमदनगर : नवरा काहीच कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचा नाद आहे म्हणून एक महिला मांत्रिकाकडे गेली. मांत्रिकाने तिच्याकडून पंधरा हजार रुपये उकळले आणि तिला एक पावडर आणि ताईत दिला. पावडर भाजीतून नवऱ्याला खाऊ घाल आणि ताईत गळ्यात बांध, असे मांत्रिकांना सांगितले. महिलेने हा प्रयोग करून पाहिला. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने पोलिसांत धाव घेतली.
पोलिसांनी मांत्रिकाविरूद्ध ‘महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ कलम ३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ साहेबराव मांडगे असे या मांत्रिकाचे नाव आहे.कर्जत तालुक्यातील एका महिलेच्या बाबतीत ही घटना घडली आहे. महिलेचा पती काही कामधंदा करत नाही. शिवाय तिला त्रास देतो.
महिलेने ही कैफियत आपल्या शेजारीणीला सांगितली. शेजारणीने जळकेवाडी येथील नवनाथ मांडगे या मांत्रिकाला तिच्या घरी बोलावले. मांत्रिकाने यावर उपाय करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मांत्रिकेने महिला आणि तिच्या मुलीला समोर बसविले. त्यांच्यासमोर पाट मांडून त्यावर गहू ठेवले.तेथे अगरबत्ती लावून त्यावर ठेवलेला गव्हाचा एक-एक दाणा बाजूला काढला. ते गव्हाचे दाणे मोजले आणि म्हणाला, ‘बाई तुझे सर्व खरे आहे. तुझा नवरा काहीही कामधंदा करत नाही. त्याला बाहेरचे नाद आहेत.’
यावर उपाय म्हणून त्याने पांढऱ्या पावडरची पुडी महिलेला दिली. ती पावडर पंधरा दिवस नवऱ्याला भाजीतून चारण्यास सांगितले. सोबत तीन ताईत दिले. ते घरातील महिलांना गळ्यात बांधण्यास सांगितले. या बदल्यात त्याने पंधरा हजार रुपये घेतले. आणखी एक हजार रुपये नंतर दे असे सांगून तो निघून गेला.काही दिवसांनी या मांत्रिकाची एका ठिकाणी भेट झाली तेव्हा त्याने राहिलेले एक हजार रुपये मागितले.
नवऱ्याला पावडर खायला घातली का? असे विचारले. मात्र पावडर खाऊनही काही फरक पडला नसल्याचे त्या महिलेने मांत्रिकाला सांगितले. मांत्रिक मात्र पैसे मागतच राहिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्या महिलेने कर्जत पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिस निरीक्षक चंद्रशेख यादव यांच्यासमोर तिने कैफियत मांडली. पोलिसांनी महिलेला आधार देत तिची तक्रार नोंदवून घेतली. पोलिसांनी मांत्रिकाविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.