जग चंद्रावर गेलंय. माहिती तंत्रज्ञानामुळे क्रांती झालीय. जग जवळ आलंय. मात्र माणसाला फेविकाॅलसारखी Favicall चिकटलेली अंधश्रध्दा काही केल्या सुटायचं नाव घेत नाही. एका महिलेचा नवरा काम करत नाही, सारखा त्रास देतो, या समस्येनं हैराण परेशान झालेली ती शेजारच्या महिलेच्या मदतीनं एका मांत्रिकाच्या संपर्कात आली.
नवनाथ मांडगे असं त्या मांत्रिकाचं नाव आहे. नगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यात असलेल्या जळकेवाडी भागातला हा मांत्रिक आहे. या महिलेच्या घरी हा मांत्रिक आला. महिला आणि तिच्या मुलीला समोर बसवून त्यांच्यासमोर पाट ठेवला. त्या पाटावर गहू ठेवले.
त्यानंतर अगरबत्ती लावली आणि पाटावरच्या गव्हाचा एक एक दाणा मोजून झाल्यानंतर नवनाथ मांडगे नावाचा हा मांत्रिक त्या महिलेला म्हणाला, ‘तुझं म्हणणं खरं आहे, तुझ्या नवर्याला बाहेरख्यालीचा नाद आहे, तो काहीही काम करत नाही’.
असं म्हणून त्या मांत्रिकानं या समस्येवर उपाय म्हणून सदर महिलेला पांढर्या रंगाची पावडर दिली. ती पावडर पंधरा दिवस भाजीतून खायला द्यायला सांगितलं. त्या पांढर्या पावडरसोबत तीन ताईत दिले, ते नवर्याच्या गळ्यात बांधल्यानंतर नवरा काम करील, त्याची बाहेरख्यालीची सवय जाईल, असं सांगून या मांत्रिकानं त्या महिलेकडून 15 हजार रुपये घेतले.
तसा हा ‘तोडगा’ 16 हजारांना ठरला. मांत्रिकानं त्यातले 15 हजार घेतले आणि उर्वरित 1 हजार रुपये नंतर द्यायचं ठरलं. दरम्यान, काही दिवसांनी हा मांत्रिक त्या महिलेला पुन्हा भेटला, तुझ्या नवर्याला काही फरक पडला का, पावडर चारली का, त्याच्या गळ्यात ताईत बांधले का, अशी प्रश्नांची सरबत्ती करत राहिलेले 1 हजार रुपये दे, असा तगादाच त्यानं त्या महिलेकडे लावला.
दरम्यान, या मांत्रिकाला 15 रुपये देऊनही काहीही फरक पडला नाही. नवर्याची सवय काही बदलली नाही. तरीही हा मांत्रिक राहिलेले 1 हजार रुपये सोडायला काही तयार नाही. हे पाहून त्या महिलेनं कर्जत पोलीस ठाणे गाठलं. पोलिसांना तिनं घडलेला सर्व प्रकार सांगितला आणि तक्रार घ्यायची विनवणी केली.
कर्जत पोलिसांनी त्या महिलेची सर्व तक्रार व्यवस्थितपणे ऐकून घेतली आणि नवनाथ मांडगे नावाच्या मांत्रिकाविरुध्द रितसर गुन्हा दाखल केला. दरम्यान, या प्रकरणाचा ज्या पोलीस कर्मचार्याकडे तपास देण्यात आलाय, त्या पोलीस हवालदार भांडवलकर यांच्याशी ‘महासत्ता भारत’नं संपर्क साधला असता त्या मांत्रिकाला अद्यापपर्यंत अटक झालेली नाही. मात्र आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच त्याला अटक होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
या मांत्रिकानं आतापर्यंत कोणाकोणाला फसवलं, यामध्ये आणखी कोण कोण आहेत, हा मांत्रिक कोणत्या मंत्रांच्या आधारे असे ‘तोडगे’ काढतो, यातून त्या मांत्रिकानं आतापर्यंत किती ‘माया’ गोळा केली, हा मांत्रिक नक्की कुठला आहे, त्यानं ही विद्या कुठून आत्मसात केली, हा मांत्रिक नरबळीच्या प्रक्रियेत सहभागी आहे का, या आणि अशा अनेक मुद्द्यांचा तपास होणं बाकी आहे. त्यामुळे नवनाथ मांडगे या मांत्रिकाची अटक ही अटळ आहे.
राज्य सरकारनं अंधश्रध्दा निर्मूलन हा कायदा केलाय. मात्र तरीही अनेक जण अद्यापही अंधश्रध्देच्या आहारी जात आहेत. अशा मंडळींनी खरं तर पोलिसांकडे जाण्याऐवजी अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे तक्रार द्यायला हवीय. पण दुर्दैवानं असं होत नाही. त्यामुळे अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकार्यांची इच्छा असूनही अशा समितीकडे तक्रारी येत नसल्यानं दुर्दैवानं अशा मांत्रिकांविरुध्द कठोर कारवाई होत नाही.