दोन हजारांची नोट बदलून घेण्यासाठी या तालुक्यात अत्यल्प प्रतिसाद !
2 हजार रुपयांची नोट बॅंकेतून बदलून घेण्याची सुरुवात मंगळवारपासून झाली. त्यामुळे देशभरातील विविध बॅंकांमध्ये नोटा बदलण्यासाठी ग्राहकांची गर्दी जमली होती. मात्र, संगमनेर शहरातील बॅंकांमध्ये नोटा बदलण्यासाठी अत्यल्प प्रतिसाद मिळाला. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने दोन हजार रुपयांच्या नोटा परत घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठीचा कालावधीदेखील निश्चित करण्यात आला आहे.
बॅंकांनी नोटा बदलण्यासाठी व्यवस्था तयार केली आहे. एखादी व्यक्ती दोन हजाराची नोटा बदलण्यासाठी गेल्यास अगोदर एक फॉर्म भरून नोटा बदलून देण्यात येतात. एका व्यक्तीला एका दिवसात फक्त वीस हजार नोटा बदलून देण्यात येतात. मात्र, त्याच्या खात्यात तो कितीही रक्कम भरून त्याचे विवरण देऊ शकतो. नोव्हेंबर 2016 ला भारत सरकारने अचानक हजार रुपये व पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या होत्या.
देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे सर्वसामान्य लोकांची पंचायत झाली होती. विशेष म्हणजे बॅंकांवरही प्रचंड ताण पडला होता आणि काहीशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. बॅंकांमध्ये नोटा बदलण्यासाठी प्रचंड रांगा लागल्या होत्या परंतु परंतु आता 2000 च्या नोटा बंद केल्याने पूर्वीसारखी परिस्थिती मात्र निर्माण झालेली दिसत नाही.
आता बॅंकांमध्ये दोन हजारांच्या नोटा बदलण्यासाठी गर्दी बघायला मिळत नाही. याचाच अर्थ असा सर्वसामान्य जनतेकडे दोन हजार रुपयांच्या नोटांचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते. ज्या व्यापारी आणि व्यावसायिकांकडे दोन हजारांच्या नोटा मोठ्या प्रमाणात असतील तर त्यांनी बॅंकेच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
“30 सप्टेंबर ही 2000 च्या नोटा बदलण्याची शेवटची तारीख असून एका ग्राहकाला एका दिवसाला 20 हजारांच्या नोटा बदलून घेता येणार आहे. आमच्या सर्व कर्मचाऱ्यांना बॅंकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला शांततेत समजावून सांगून फॉर्म भरून नोटा बदलून देण्यात येतात,” असे बॅंक ऑफ महाराष्ट्रचे चीफ मॅनेजर ज्योतीरंजन सामंतराय यांनी सांगितलं.