दुधाचे दर कमी करायचे असतील तर पशुखाद्याचे दर कमी करा ; ‘या’ शेतकऱ्यांनी केली मागणी
दुधाचे दर घसरण्यास सुरुवात झाली आहे. ऐन उन्हाळ्यात दूधदरात तब्बल 4 रुपयांनी घसरण झाली असून, त्याचा परिणाम थेट शेतकर्यांच्या अर्थकारणावर होणार आहे. दुसरीकडे पशुखाद्याचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. दुधाला चांगली मागणी असतानाही दर कमी होत असल्याने शेतकर्यांना फटका बसणार आहे. मागील काही वर्षांपासून तरुण दुग्धव्यवसायाकडे मोठ्या प्रमाणावर वळले आहेत.
बँका, पतसंस्थांची नवीन दूध व्यावसायिक कर्जाच्या कात्रीत सापडण्याची शक्यता आहे. मागील 15-16 महिन्यांपासून गाय, म्हशीच्या दूधदरात वाढ झाली होती. प्रतिकूल परिस्थितीत शेतकर्यांसाठी हे ‘अच्छे दिन’ मानले जात होते. स्थानिक पातळीवर वाढत्या दराची अंमलबजावणी झाल्याने शेतकर्यांना फायदा झाला होता.
अनेक तरुण या व्यवसायात गुंतले आहेत. दुधाच्या दरकपातीमुळे ते कर्जाच्या विळख्यात अडकणार असल्याची भीती व्यक्त करीत आहेत. दुधाचे दर आता 38 रुपये लिटरहून थेट 34 रुपयांवर आले आहेत. अगोदरच मागील काही महिन्यांपासून ‘लम्पी’ आजारामुळे पशुपालक अडचणीत आहेत.
आता चाराटंचाईचेही संकट आहे. महाग दराने चारा विकत घ्यावा लागत असल्याने दुग्धोत्पादनाचा खर्च वाढला. मात्र, उत्पन्नात घटच होत आहे. खासगी दूध संघ व शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे दुधाची मागणी वाढली असतानाही बाजारभाव कमी झाले आहेत.
ओला-सुका चार्याची कमी असताना ऐन उन्हाळ्यात दुधाचे दर कमी केल्याने दुग्धोत्पादकांवर आर्थिक संकट ओढवणार आहे. अनेक तरुण शेतकरी या व्यवसायाकडे आशेने पाहू लागले असताना खासगी दूध संघ दुधाचे बाजारभाव कमी करीत आहेत. दुसरीकडे पशुखाद्याचे दर मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत. दुधाचे दर कमी करायचे असतील, तर आधी पशुखाद्याचेही दर कमी करा, अशी मागणी दुग्धोत्पादक शेतकरी तानाजी पवार यांनी केली आहे.