‘त्यां’च्या प्रतिक्रिया हाच पत्रकारितेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ; तोच खरा पत्रकारदिन ! 26 वर्षांच्या पत्रकारितेतल्या सिंहावलोकनाच्या निमित्तानं…!

spot_img

‘त्यां’च्या प्रतिक्रिया हाच पत्रकारितेचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार ; तोच खरा पत्रकारदिन !

26 वर्षांच्या पत्रकारितेतल्या सिंहावलोकनाच्या निमित्तानं … !

पत्रकारितेचे जनक कै. बाळशास्री जांभेकरांच्या स्मृतिदिनाचं औचित्य साधून आजच्या पत्रकारदिनी प्रथमत: त्यांना आम्ही विनम्र अभिवादन करत आहोत. आजच्या पत्रकारदिनाच्या सर्व ‘महासत्ता भारत’चे वाचक व पत्रकार बांधवांना अंत:करणातून खूप खूप शुभेच्छा!

गेल्या 26 वर्षांच्या आमच्या पत्रकारितेचं आजच्या पत्रकारदिनी जर सिंहावलोकन करायचं झालं तर संपूर्ण भूतकाळ डोळ्यासमोर उभा राहतो. नगरी पत्रकारितेतला त्यावेळचा तो आमचा चंचूप्रवेश, सायकलवरचा तो संघर्ष, ते यश अपयश, मान अपमान (खरं तर यश आणि मान कमीच पण त्यातच आम्ही समाधान मानलं.) या सर्व गतकाळातल्या स्मृती जाग्या झाल्या, की आमचंच आम्हाला आश्चर्य वाटतं, की खरंच कसे होते ना ते दिवस !

आजची ‘महासत्ता भारत’ची यशस्वी, दमदार वाटचाल आणि पत्रकारितेतल्या या प्रवासात आम्हाला भेटलेल्या अनेक अन्यायग्रस्त, अत्याचारित व्यक्तींच्या ‘महासत्ता भारत’च्या माध्यमातून न्याय मिळवून देण्यासाठी दिलेल्या बातम्यांनंतर आनंददायी प्रतिक्रियांचे ज्यावेळी आम्हाला अनेक फोन व प्रत्यक्ष भेटायला येतात, त्यावेळी ते आमच्यासाठी पत्रकारितेचा सर्वोच्च पुरस्कार आणि तोच दिवस आमच्या खरा पत्रकारदिन असतो, असं आम्ही समजतो.

सन 1997 साली आमचा नगरी पत्रकारितेत प्रवेश झाला. सुरुवातीला ज्येष्ठ पत्रकार सुहास देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली दैनिक ‘तरुण भारत’साठी भिंगार प्रतिनिधी म्हणून आम्ही काम सुरु केलं. त्या भिंगारमध्ये आम्हाला एक जीवाभावाचा मित्र भेटला, भारत पवार हे त्या दिलदार मित्राचं नाव.

पत्रकारिता हा व्यवसाय नाही, तर दीनदुबळ्यांचा, अन्यायग्रस्त आणि अत्याचारित व्यक्तींचा आवाज सरकार दरबारी पोहोचविण्याची खरी सेवा, असं भारत पवारांचं त्यावेळचं तत्वज्ञान आम्हाला खूप काही शिकवून गेलं. आजही भारत पवार आमच्यासोबत सावलीप्रमाणं आहेत.

पत्रकारितेचा आमचा खरा प्रवास भिंगारमधूनच सुरु झाला. नेवासे तालुक्यातल्या सोनई या खेडेगावातून भिंगार व्हाया नगरच्या आमच्या पत्रकारितेचा प्रवास मोठा रंजक ठरला. अर्थात पत्रकारितेचा आमच्या पिढीतल्या कोणालाही अनुभव नव्हता. पण आम्ही संघर्ष करत गेलो, शिकत गेलो आणि आज स्वमालकीच्या ‘महासत्ता भारत’ या वेब न्युज नेटवर्कपर्यंत पोहोचलो.

नगरच्या पत्रकारितेत आम्हाला खर्‍या अर्थानं व्यासपीठ मिळवून दिलं, ते ज्येष्ठ पत्रकार आदरणीय नंदकुमार सातपुते (नाना) यांनी. सायं. दैनिक ‘लोकयुग’मध्ये सातपुते नाना आणि त्यावेळचे कडक शिस्तीचे पण प्रेमळ सहकारी साॅलोमन गायकवाड यांच्या सहवासात आमची पत्रकारिता खर्‍या अर्थानं बहरली, फुलली.

खरं तर त्यापूर्वी खिळ्यावरची अक्षरं जुळवून वर्तमानपत्राची प्लेट तयार करणार्‍या त्या सोनेरी काळातल्या पत्रकारितेचाही आम्ही दांडगा अनुभव घेतलाय. त्यावेळचं साप्ताहिक ‘सुवर्णसंधी’ या विठ्ठल शिंदेंच्या पेपरमध्येही आम्ही काम केलं. त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार आणि जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष, नवा मराठा या सायंदैनिकाचे संपादक सुभाष गुंदेचा यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे मित्र ललित गुंदेचा यांच्याबरोबर पत्रकारिता करण्याचाही अनुभव आम्हाला मिळाला.

दरम्यानच्या काळात त्यावेळच्या काही स्थानिक वृत्तवाहिन्यांमध्येही आम्हाला पत्रकारितेचा अनुभव घेता आला. माळीवाड्याच्या पारगल्लीमध्ये त्यावेळी सुरु करण्यात आलेल्या विशाल वार्ता या वृत्तवाहिनीत आम्ही काम केलं. तत्पूर्वी नगर न्युजलाईन, न्युज टुडे, एनटीव्ही न्युज चॅनल आदी वृत्तवाहिन्यांमध्येही आम्हाला पत्रकारिता अनुभवता आली.

दरम्यान, ‘नवा मराठा’मध्ये काम करत असताना भारत पवारांच्या पुढाकारातून भिंगार प्रेस क्लबची स्थापना करण्यात आली. पत्रकारदिनाचं औचित्य साधून भिंगारच्या रोकडेश्वर मंदीरात एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करण्यात आला. भिंगार प्रेस क्लबच्या अध्यक्षपदाची जबाबदारीही आमच्यावर सोपविण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार सुभाष गुंदेचा, महेश नागरी पतसंस्थेचे नंदकुमार (मन्नूशेठ) झंवर, संजय सपकाळ, विलास रासकर, शिवाजी दहीहंडे, कदीर शेख आदींसह भिंगारचे काही नागरिक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते.

त्यानंतर ज्येष्ठ पत्रकार शिवाजी शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली खर्‍या अर्थानं आमच्या ‘डिजिटल’ पत्रकारितेची बीजं रोवली गेली. त्यापूर्वी कागद आणि पेनच्या सहाय्यानं आम्ही बातमी लिहित होतो. पण दैनिक ‘देशदूत’मध्ये नगर शहर प्रतिनिधी म्हणून काम करत असताना ज्येष्ठ पत्रकार शिर्के यांनी कडक शब्दांत सांगितलं, ‘बाळासाहेब, यापुढे बातमीसाठी कागद आणि पेनचा अजिबात वापर करायचा नाही. काॅम्प्युटरवरच बातम्या करायच्या’.

ज्येष्ठ पत्रकार शिर्के यांच्या ‘नगर सह्याद्री’मध्येही आम्हाला पत्रकारिता करण्याची संधी मिळाली. त्यानंतर मग आम्ही नगरी पत्रकारितेतून काही दिवस थोडंसं लांब राहिलो. पण प्रभंजन कनिंगध्वज यांच्या माध्यमातून डाॅ. अशोक सोनवणे यांच्या दैनिक ‘लोकमंथन’मध्ये आम्ही पुन्हा पत्रकारितेत आलो आणि तिथं अडीच वर्षे काम केलं. डाॅ. सोनवणे यांची बहुजन समाजासाठीची पत्रकारिता, त्यांचे बेधडक विचार आम्हाला खूप सारी प्रेरणा देऊन गेले.

दैनिक ‘लोकमंथन’नंतर मात्र प्रिंट मिडियापासून आम्ही कायमचं दुरावलो आणि ‘नगरी वज्रमूठ’ या वेबपोर्टलच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र डिजिटल पत्रकारिता सुरु केली. वास्तविक पाहता आमच्या पत्रकारितेतल्या प्रवेशाचा उद्देश हा केवळ भ्रष्ट पोलीस आणि तत्कालिन नगर पालिकेच्या अधिकार्‍यांना नागडं करणं हाच होता. त्यामुळे पोलिसांच्या अपप्रवृत्ती, भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांच्या बातम्यांना आम्ही प्रथम प्राधान्य द्यायचो.

यादरम्यान, काहीशा वादातून आम्हाला नगर एलसीबीचे तत्कालिन पीआय दिलीप पवार हे मित्र भेटले. त्यांनी मित्रत्वाचा सल्ला दिला, ‘काही चांगलं आणि सकारात्मक पण वस्तुनिष्ठ लिहा’. या विचारातून ‘महासत्ता भारत’ संस्थापक संपादक भारत पवार आणि आमच्यात झालेल्या दोन तीन दिवसांच्या नियोजनात्मक चर्चेनंतर ‘महासत्ता भारत’ या डिजिटल न्युज नेटवर्कचा उदय झाला.

‘महासत्ता भारत’चे संस्थापक संपादक मा.भारत पवार यांचा अनुभव, निर्भीडपणा, सहकार्याची भावना व आपल्या लेखणीतून कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेणारा सहानभूती चा स्वभाव या सर्व बाबींची साथ व पत्रकारिता व्यवसाय नसून समाजसेवा आहे हा त्यांचा विचार घेऊन मा. भारत पवार व आमची ‘महासत्ता भारत’च्या माध्यमातून निर्भीडपणे वाटचाल सुरू आहे.

आजमितीला ‘महासत्ता भारत’चं नगरच्या कोठला परिसरात वातानुकुलित असं प्रशस्त कार्यालय आहे. त्या कार्यालयातून राज्यभरातल्या अन्यायग्रस्त लोकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम सुरु आहे. ‘अन्यायाविरुध्द जनसंघर्षाचा झंझावात’ या टॅगलाईननुसार ‘महासत्ता भारत’ची दमदार वाटचाल सुरु आहे.

नगरच्या पत्रकारितेत आम्हाला अनेक जीवाभावाचे मित्र भेटले. त्यामध्ये पोपट लोढा, श्रीराम जोशी, मिलिंद चवंडके, अजय धोपावकर, अशोक झोटिंग, निशांत दातीर, भाऊसाहेब होळकर, सुभाष चिंधे, सुभाष मुदळ, राजेंद्र त्रिमुखे, साईराम गारडे, इकबाल शेख, मुकुंद भालेराव, बबलू शेख, समीर मनियार, वाजिद शेख, राजू खरपुडे, गजेंद्र राशिनकर, मनोज मोतियानी, हेमंत साठे आदींसह अनेकांचा समावेश करता येईल.

पत्रकारितेचा वापर बक्कळ पैसा कमवण्याचा आम्ही कधीच केला नाही. एखादी बातमी समजली, की छापायचीच, मग ती बातमी कोणाबद्दल आहे, त्या बातमीमुळे आपण कोणाकोणाला अंगावर घेत आहोत, याचा आम्ही कधीच विचार केला नाही.

कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून किंवा कोणाला ‘गाॅडफादर’ समजून त्याच्यासाठी लाळघोटेपणा करणारी पत्रकारिता आम्हाला कधीच आवडली नाही. जे आहे, ते जसंच्या तसं लिहिण्याची आमची मानसिकता आजही अबाधित आहे. यापुढेही जोपर्यंत जीवंत राहू तोपर्यंत अन्यायग्रस्तांना न्याय देण्यासाठी ‘महासत्ता भारत’ सदैव कटिबध्द राहिल, या अभिवचनासह तूर्त इथंच थांबतो. धन्यवाद.

सदैव,

आपलाच मित्र,

बाळासाहेब शेटे पाटील
मुख्य संपादक
‘महासत्ता भारत’ न्युज नेटवर्क
[email protected]
MO. NO. 702835147

कार्यालयीन पत्ता :

‘महासत्ता भारत’
राज चेंबर्स, कोठला परिसर, सर्जेपुरा, अहमदनगर, महाराष्ट्र.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :