‘ते’ कमिशन नक्की कोणाच्या खात्यात जमा झालं?
दोन दिवसांत माहिती देण्याचे उपनिबंधक रत्नाळे यांचे आदेश!
अहमदनगर जिल्ह्यातल्या सहकार चळवळीला सुरुंग लावत ही चळवळ कलंकित करण्याचे ‘उद्योग’ सुरु असल्याची बातमी ‘महासत्ता भारत’नं दोन – तीन दिवसांपूर्वी व्हायरल केली होती. या बातमीची नगर तालुक्यात प्रचंड चर्चा झाली. दरम्यान, या बातमीची नगरचे डीडीआर अर्थात जिल्हा उपनिबंधक रत्नाळे यांची गांभिर्यानं दखल घेतली आहे.
नोबेल कोरोना व्हायरस (कोविड 19) प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरीब कल्याण योजनेअंतर्गत केंद्र सरकारच्या माध्यमातून मोफत धान्य सार्वजनिक वितरण व्यवस्थेतल्या पात्र लाभार्थ्यांना एप्रिल 2020 पासून स्वस्त धान्य दुकानांमार्फत वाटप करण्यात आलेलं आहे. या मोबदल्यात स्वस्त धान्य दुकानं चालविणार्या 70 सोसायट्यांना सरकारकडून लाखो रुपये कमिशन देण्यात आलं होतं. हे कमिशन सोसायट्यांच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी सेल्समनच्या खात्यात जमा करण्याचा प्रकार घडलाय.
नगर तालुक्यातल्या वाळकीच्या मोनाली बोठे आणि अरुण बोठे या बोठे दाम्पत्यानं ‘महासत्ता भारत’च्या सर्जेपूरा भागातल्या कोठला परिसरातल्या कार्यालयात प्रसिध्दीसाठी निवेदन दिलं होतं. या निवेदनात बोठे यांनी म्हटलंय, की नगर तालुक्यात असलेल्या 70 पैकी 54 सेवा सोसायट्यांना स्वस्त धान्य वाटपाचं राज्य सरकारकडून जे कमिशन येतं, ते कमिशन सोसायट्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे स्पष्ट आदेश आहेत.
असे आदेश असताना सदरचं कमिशन सेवा सोसायट्यांच्या बँक खात्यात जमा करण्याऐवजी सेल्समनच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं. त्यामुळे हे कमिशन नक्की कोणाच्या बँक खात्यात जमा करण्यात आलं, याची दोन दिवसांत माहिती द्यावी, असे आदेश सर्वच म्हणजे 70 सोसायट्यांच्या चेअरमन आणि सचिवांना जिल्हा उपनिबंधक रत्नाळे यांनी एका पत्राद्वारे दिले आहे.
दरम्यान, यासाठी रत्नाळे यांनी सर्व संबंधित सेवा सोसायट्यांच्या सचिवांची दुपारी साडेबाराच्या सुमारास तातडीची बैठक बोलवली. ही बैठक सायंकाळी उशिरापर्यंत सुरु होती. या बैठकीत रत्नाळे यांनी सचिवांना छापील पत्र दिलं. त्या पत्रातल्या विहित नमुन्यात सरकारचं 2021 – 22 चं मार्जिन किंवा कमिशन कोणाच्या खात्यात जमा करण्यात आलं, याची माहिती देण्याचे आदेश रत्नाळे यांनी आजच्या (दि. 5)बैठकीत दिले.