‘तु मला मार खायला लावणार की माझा मार खाणार ? असं का म्हणाली असेल गौतमी पाटील ?
लावणी नृत्याच्या आडून सुरुवातीला अश्लील चाळे केल्याचा आरोप जिच्यावर झाला आणि सर्वत्र तिच्याविषयी नापसंती व्यक्त केली गेली, टीका देखील झाली, अशी अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या लावणी डान्सर गौतमी पाटीलची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे.
लावणी सादर करताना एका गाण्यावर अश्लील हावभाव केल्याचा आरोप गौतमी पाटीलवर झाला होता. त्यावेळी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीदेखील नाराज व्यक्त केली होती.
‘रातीला अर्ध्या रातीला असं सोडून जायाचं नाय’ या गाण्यावर गौतमी पाटीलनं अश्लील हावभाव केल्याचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर महाराष्ट्रातल्या रसिक मायबाप प्रेक्षकांची जाहीर माफी मागितली आणि लावणीच्या नृत्यांमध्ये सुधारणा करेल असं आश्वासन तिनं दिलं होतं.
दरम्यान, एका टीव्ही पत्रकाराने गौतमी पाटीलची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये सदर पत्रकाराने गौतमी पाटीलला अनेक प्रश्न विचारले. ज्यामध्ये तिच्या आवडीनिवडी, तिचं शिक्षण आदी प्रश्नांचा समावेश होता.
या प्रश्नांमध्ये त्या टीव्ही पत्रकाराने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला. हा प्रश्न ऐकून गौतमी पाटील गोंधळली. मात्र हसतच म्हणाली, तु मला मार खायला लावणार की माझा मार खाणार? यावर कार्यक्रमाच्या ठिकाणी मोठा हशा पिकला होता.
महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी विचित्र परिस्थिती सध्या पाहायला मिळतेय. भल्या भल्यांच्या या दोघांतून नक्की कोणाला निवडायचं, हे लवकर लक्षात येत नाही तिथे गौतमी पाटील हा अपवाद कसा असणार ?
अगदी कमी वयातच गौतमी पाटीलनं लोकप्रियतेचं उत्तुंग असं शिखर गाठलं. लावणी सादरीकरणाचे ती तब्बल दीड लाख रुपये मानधन घेते. लवकरच ती ‘घुंगरू’ या चित्रपटात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.