‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’ ! काय आहे, यामागची कहाणी ?

spot_img

‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’ ! काय आहे, यामागची कहाणी ?

 

हिंदू ह्रदयसम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना

सन 1990 – 95 साली विधानसभेत पोहोचली होती. त्यावेळी बाळासाहेबांच्या एका इशार्‍यावर मुंबई बंद होत होती. त्या सुमाराला दाऊद इब्राहिमच्या गुन्हेगारी जगताचा उदय झाला.

 

त्यावेळच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय सभांमधून बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप चालायचे. अशाच एका सभेत बाळासाहेब ठाकरे शरद पवारांना उद्देशून म्हणाले होते, ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’.

 

असं जर होतं, तर मग गवळीनं शिवसेनेची साथ का सोडली ? हे जाणून घेण्यासाठी भूतकाळात जावं लागेल. अशातच 1992 साली मुंबईतल्या जे. जे. हाॅस्पिटलमध्ये एक प्रसिध्द कांड घडलं. मेव्हुण्याच्या हत्येचा बदला घेण्यासाठी दाऊदच्या टोळीनं जे. जे. हाॅस्पिटलवर हल्ला केला. त्या हाॅस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या दाऊदच्या मेव्हुण्यांच्या मारेकर्‍यांना संपवलं.

 

दरम्यानच्या काळात दाऊदच्या टोळीला पळून जाण्यासाठी भिवंडीच्या तत्कालिन महापौरांनी मदत केली होती. त्यामुळे दाऊदची चर्चा विधानसभेतही गाजली. असंच काहीसं घडलं गो. रा. खैरनार यांच्या बाबतीत. खैरनार यांनी शरद पवार यांचे दाऊदशी संबंध असल्याचा आरोप केला होता.

 

दाऊदचे निकटवर्तीय शर्मा यांनी शरद पवारांच्या विमानातून प्रवास केल्याचा आरोप खैरनारांनी त्यावेळी सांगितलं होतं. यामागे दाऊदची आवडती इमारत ‘मंजित’ पाडल्याचं कारणीभूत असल्याचं सांगण्यात आलं. खैरनार हे त्याकाळी अनधिकृत बांधकामं पाडत होते.

 

या कारवाईत दाऊदची इमारत वाचविण्यासाठी शरद पवार हस्तक्षेप करत असल्याचा खैरनार यांचा आरोप होता. एकीकडे दाऊदच्या टोळीला पळून जाण्यासाठी भिवंडीतल्या काँग्रेसच्या महापौरांनी केलेली मदत तर दुसरीकडे शरद पवारांनीही दाऊदला मदत केल्याचं बोललं जात असल्याचं चित्र तयार करण्यात आलं.

 

त्यानंतर 1993 साली बाँबस्फोट झाले आणि त्यानंतर मुंबईचा गुन्हेगार असलेला दाऊद पाकिस्तानात पळून गेला, देशद्रोही झाला आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगार झाला. या सर्व पार्श्वभूमीवर 1995 साली विधानसभेच्या निवडणूका जाहीर झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये प्रचार सभांमध्ये बोलताना बाळासाहेब म्हणाले होते, ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’.

 

त्या निवडणुकीत हा मुद्दा खूप गाजला होता. निवडणूका झाल्या, निकाल आणि प्रथमत:च राज्यात भाजप सेना युतीची सत्ता आली. बाळासाहेबांनी अरुण गवळींना थेट पाठिंबा दिला होता. गवळींनी याचा अर्थ असा काढला, की आपल्यामुळे शिवसेनेची सत्ता आली. या काळात गवळी औरंगाबादच्या जेलमध्ये होते.

 

काँग्रेसच्या सत्तेत जेलमध्ये गेलेले गवळी युतीची सत्ता येताच जेलबाहेर आले. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. एमपीडीए कायद्यांतर्गत त्यांना पुन्हा अटक झाली आणि सेनेमुळेच आपल्याला अटक झाली, असा गैरसमज गवळींना झाला.

 

गवळी जेलमध्ये असताना मुंबईत गवळी, दाऊद, राजन, नाईक असे गँगवार होऊ लागले. या गँगवाॅरला उत्तर म्हणून मुंबईत पोलिसांमार्फत ‘एन्काऊंटर’ची स्कीम आणली. एकीकडे गवळी जेलमध्ये अडकून पडले, तर दुसरीकडे त्यांच्या शार्प शूटरचे एकामागून एक ‘एन्काऊंटर’ करण्यात आले.

 

याचा गवळींच्या डोक्यात राग होता. यातच जयंत जाधव यांचा खून झाला. जयंत जाधव हे बाळासाहेबांचे मानस पुत्र मानले जात होते. त्यांच्याच सल्ल्यानं गवळींचं नेटवर्क तोडण्यात आल्याची चर्चा होती. बदला म्हणून गवळींनी हा खून घडवून आणला. त्यात गवळींना अटक झाली. पुढे साक्षीदार फितूर झाल्यानं गवळींची मुक्तता करण्यात आली.

 

अरुण गवळी जेलमधून बाहेर पडले, ते शिवसेनेला संपविण्याच्या निर्धारानंच. त्यासाठी त्यांनी अखिल भारतीय सेना हा पक्ष काढला. यासाठी जितेंद्र दाभोळकर यांची गवळींना मदत झाली. स्थानिक पातळीवर शिवसेनेच्या अनेक शाखेचे शिवसैनिक अखिल भारतीय सेनेत जाऊ लागले.

 

4 ऑक्टोबर 1997 रोजी जितेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली आणि गवळींच्या अखिल भारतीय सेनेला ब्रेक लागला. त्यानंतर गवळींची सेना डोकं वर काढू शकली नाही. कारण जितेंद्र दाभोळकर हेच गवळींच्या अभासेनेचे एक मात्र ‘ब्रेन’ होते.

 

सन 2004 च्या लोकसभा निवडणुकीत अरुण गवळी उभे राहिले आणि पराभूत झाले. मात्र 2004 च्याच विधानसभा निवडणुकीत विजयी होऊन आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. पण पुढे कमलाकर जामसंडेकर यांच्या हत्येप्रकरणी गवळींना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि गवळी शांत झाले.

 

2014 साली अरुण गवळींची मुलगी गीता गवळी आमदारकीला उभी राहिली. विशेष म्हणजे या निळडणुकीत शिवसेनेनं उमेदवार दिला नाही. त्यामुळे शिवसेनेचा अरुण गवळींना पाठिंबा, विरोध आणि पाठिंबा असं एक वर्तूळ यानिमित्तानं पूर्ण झालं. ‘तुमचा दाऊद तर आमचा अरुण गवळी’ या वाक्यानं सुरु झालेलं हे 21 वर्षांचं राजकारण आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :