ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाखांच्या आदर्श विचारांचा आला ‘त्या’ सोहळ्यात प्रत्यय !
नेवासे तालुक्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ साहित्यिक, माजी खासदार यशवंतराव गडाख यांचे साहित्यावर प्रेम करण्याच्या विचारांचा प्रत्यय सोनईतल्या मुळा पब्लिक स्कूलमध्ये पार पडलेल्या विवाह सोहळ्यात आला. या सोहळ्यात हार तुरे न आणता अनेकांनी पुस्तके, सायकली आणि अन्य वस्तू दिल्या.
माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे पुत्र उदयन गडाख यांचा माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डाॅ. निवेदिताशी विवाह संपन्न झाला. या विवाह सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या आप्तस्वकियांनी वधू आणि वराला पुस्तके, सायकली, दप्तर आदींची भेट दिली. यामध्ये स्वत:च्यावतीनं आणखी भर घालून उदयन गडाख गरजू विद्यार्थ्यांना भेट म्हणून देणार आहेत.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांनी राजकारणासह साहित्य निर्मिती केली. गडाख यांची आतापर्यंत तीन पुस्तके मराठी साहित्य क्षेत्रात आली आहेत. ज्येष्ठ नेते गडाखांच्या आदर्श विचारांनुसार या परिवारानं सतत साधेपणा जपलाय. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून गरीब आणि असहाय्य लोकांना नेहमी मदत केली आहे.
विवाह सोहळ्यातला डामडौल डावलून अत्यंत साधेपणानं आणि अनावश्यक खर्चाला फाटा देत या परिवारानं यापूर्वीही विवाह सोहळे पार पाडले आहेत. माजी मंत्री शंकरराव गडाख आणि सुनिता गडाख यांचाही विवाह मुळा पब्लिक स्कुलच्या प्रांगणात साध्या पध्दतीनंच झाला होता.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाखांनी राजकारणाच्या माध्यमातून नेवासे तालुक्याला एक वेगळी ओळख करुन प्राप्त करुन दिलीय. मुळा कारखाना, विद्यालय, महाविद्यालय, सहकारी सोसायट्या, पतसंस्थांच्या माध्यमातून नेवासे तालूका वैभव संपन्न झाला.
दरम्याम, उदयन आणि डाॅ. निवेदिता यांच्या विवाह सोहळ्यास माजी मंत्री आदित्य ठाकरे, महसूल आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे, आ. संग्राम जगताप, आ. निलेश लंके आदींसह विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते.