भिंगार- कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीचा राग मनात धरून गावच्या सरपंचाने दोघा भावांवर तलवार, कोयत्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना नगर तालुक्यातील शहापूर गावात घडली आहे.याबाबत गावच्या सरपंचासह त्याच्या भावावर गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्या दोघांनाही अटक केली आहे.
या हल्ल्यात सोमनाथ भानुदास बेरड व सतिष भानुदास बेरड (दोघे रा. शहापूर ता. नगर) हे दोघे जखमी झाले आहेत. सोमवारी (दि.२) सायंकाळी शहापूर शिवारात बेरड यांच्या घरात व गावातील खंडोबा मंदिराजवळ ही घटना घडली. जखमी सोमनाथ यांच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात शहापूर गावचे सरपंच दत्तात्रय दिलीप भालसिंग, संतोष दिलीप भालसिंग (दोघे रा. शहापूर) या दोघांविरूध्द खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख, पोलीस उपनिरीक्षक एम.के.बेंडकोळी यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सरपंच दत्तात्रय भालसिंग व त्यांचा भाऊ संतोष भालसिंग यांना ताब्यात घेत अटक केली आहे.
सोमवारी सायंकाळी सोमनाथ बेरड हे घरी असताना दत्तात्रय भालसिंग व संतोष भालसिंग हे हातामध्ये कोयता, तलवार घेऊन सोमनाथच्या घरात घुसले. त्यांनी सोमनाथला घरातून बाहेर ओढून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीच्या कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करत धक्काबुक्की केली. जीवे मारण्याच्या उद्देशाने दत्तात्रय बेरड याने कोयता व संतोष बेरड याने तलवारीने हल्ला केला.
सोमनाथ यांनी कोयता व तलवारीने अंगावर केलेले वार हुकवले. दरम्यान त्यावेळी मध्ये आलेले सतीश बेरड यांच्या नाकावर तलवार लागून ते जखमी झाले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करीत दोघांना अटक केली असून अधिक तपास उपनिरीक्षक बेंडकोळी करीत आहेत.