खुनाचा चुकीच्या पध्दतीनं तपास केला ! ‘या’ पोलीस अधिकार्याला शासनानं दिली शिक्षा !
पारनेर तालुक्यातल्या निघोज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच संदीप वराळ यांचा गेल्या काही दिवसांपूर्वी खून झाला. या प्रकरणाचा तपास तत्कालीन उपविभागीय पोलिस अधिकारी आनंद भोईटे यांनी केला. परंतू, चुकीचा तपास केल्याचा ठपका ठेवत भोईटे यांना राज्य शासनानं शिक्षा दिली.
आनंद भोईटे हे सध्या बारामती येथे अपर पोलिस अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. संदीप वराळ यांच्या खुनाचा तपास करताना आनंद भोईटे यांनी दोन बनावट साक्षीदार दाखवले असल्याबाबत तक्रार करण्यात आली होती. त्यावेळी ज्यांना साक्षीदार करण्यात आले होते, त्यातले साक्षीदार अर्जुन गजरे हे मयत होते. तर दुसरे साक्षीदार प्रकाश रसाळ हे घटना घडली त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्त वास्तव्यास होते.
या प्रकरणी करण्यात आलेल्या तक्रारीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत ही बाब समोर आली.
साक्षीदारांच्या जबाबावर या गुन्ह्यातल्या कटाचा आरोप असलेले बबन कवाद आणि मुक्तार इनामदार यांनी आक्षेप घेतला होता. त्याबाबत त्यांनी राज्य शासनाकडे तक्रारदेखील केली. परंतू त्यांच्या तक्रारीची कोणीही दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात याबाबत धाव घेतली होती.
खंडपीठात हे प्रकरण चालले आणि बनावट साक्षीदार दाखवल्याप्रकरणी तपास अधिकारी आनंद भोईटे यांना दोषी धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले. गुन्हा दाखल झाल्यानंतर भोईटे यांनी औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात तात्पुरती स्थगिती घेतली.
गृह विभागानं आनंद भोईटे यांची चौकशी करून ते दोषी असल्याचा अहवाल राज्य शासनाकडे सादर केला. त्यानंतर शासनाने आनंद भोईटे यांना पगारवाढ बंद रोखण्याची शिक्षा दिली.