खासदार संजय राऊत जेलमध्ये जाऊन आल्यानं ‘असं’ वागताहेत ! महाराष्ट्राच्या जनतेला विकास हवाय ; सरकारला चांगल्या सूचना द्या ! माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य !
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे जेलमध्ये जाऊन बिघडलेत. त्यामुळं ते हल्ली पहिल्यापेक्षा जास्त वायफळ आणि व्यर्थ बडबड करत आहेत. महाराष्ट्राच्या जनतेला मात्र हे असं काहीही अपेक्षित नाही.
या राज्यातल्या जनतेला विकास हवाय. खासदार राऊत यांनी व्यर्थ बडबड करण्यात स्वत:चा आणि जनतेचा अमूल्य वेळ वाया घालविण्यापेक्षा शिंदे – भाजप सरकारला चांगल्या सूचना कराव्यात, असं वक्तव्य माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय.
माजी मंत्री बावनकुळे म्हणाले, शिवसेनेचे खासदार राऊत आम्हाला गद्दार म्हणत आहेत. पण बाळासाहेबांची शिवसेना फोडण्यासाठी खरं तर खासदार राऊत यांनीच पुढाकार घेतला.
यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार असताना शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांना कुठलाही विकासनिधी दिला जात नव्हता. सर्व काही निर्णय राष्ट्रवादीचे नेते आणि तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार हेच घ्यायचे. सरकारमध्ये असूनही शिवसेनेच्या नेते आणि कार्यकर्त्यांना सरकारमध्ये काहीच किंमत नव्हती.
तत्कालिन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गंभीर तक्रारी करण्यासाठी त्यावेळी मंत्री आणि आमदार जायचे. मात्र खासदार राऊत हे त्यांना भेटू देत नव्हते.
बाळासाहेबांनी प्रचंड अशा संघर्षातून उभी केलेली मराठी बांधवांची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधायचं काम खर्या अर्थानं खासदार राऊत यांनी केलं. आम्हाला गद्दार म्हणण्याचा खासदार राऊत यांना कसलाच अधिकार नाही.
राज्यातल्या जनतेला खासदार राऊत यांनी व्यर्थ बडबड नको आहे. जनतेला या राज्याची भरभराट हवी आहे. राज्याचा विकासदर GDP कसा वाढेल, याची या राज्यातल्या जनतेला अपेक्षा आहे. खासदार राऊत यांनी चांगल्या सूचना करुन शिंदे – भाजप सरकारकडून राज्याचा विकास करुन घ्यायला हवाय’.