खडकवासला धरणात बुडालेल्या सात मुलींना वाचवण्यात यश
खडकवासला धरणात बुडालेल्या दोन मुलींचे मृतदेह सापडले आहेत. खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ मुलींपैकी सात मुलींना वाचविण्यात यश आले होते. दोन मुलींचा शोध घेतला असता त्यांचा मृतदेह मिळाला आहे. गोऱ्हे खुर्द गावच्या हद्दीत ही घटना घडली.
यामध्ये कुमुद संजय खुर्द (वय 13), शितल भगवान टिटोरे (वय 15) या दोन मुलींचा मृत्यू झाला असून पायल संतोष सावळे (वय 16), शितल अशोक धामणे (वय 17), पल्लवी संजय लहाने (वय 10), राशी सुरेश मांडवे (वय 9), राखी संजय लहाने (वय 16) आणि 32 वर्षीय मीना संजय लहाने या मुली बचावल्या आहेत.
आज सकाळी खडकवासला धरण क्षेत्रातील गोऱ्हे बुद्रुक येथील कलमाडी फार्म हाऊसच्या मागील बाजूस कपडे धुण्याकरता आणि आंघोळी करता या मुली आल्या होत्या. त्यावेळी या मुली पाण्यात उतरल्या. तर एक महिला कडेला आंघोळ करत होत्या. पाण्यात उतरलेल्या मुलींना पाण्याचा अंदाज आली नाही, त्यामुळे त्या बुडू लागल्याचे दिसताच बाहेर थांबलेल्या दोन मुलींनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
तेथून काही अंतरावर स्मशानभूमी होती. त्यावेळी तिथे सावडण्याचा विधी सुरू होता. त्या मुलींचा आरडाओरड पाहून तेथील नागरिक पाण्यात बुडत असलेल्या मुलींच्या दिशेने धावत आले.
त्यातील काहीनी पाण्यात उडू मारून मुलींना सुखरूप बाहेर काढले. तर अन्य दोन मुलींचा तब्बल तासाभराने मृतदेह काढण्यात आला. या सर्व मुली बुलढाणा येथील आहेत. तसेच या घटनेतील जखमी मुलींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.