‘केरला स्टोरी’ या चित्रपटाने
१३ दिवसांत कमवला १६५.९४ कोटींचा गल्ला !
अनेक राज्यांमध्ये बंदी असूनही ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. १३ दिवसांत या चित्रपटाने १६५.९४ कोटींचा गल्ला जमवला आहे. लवकरच हा चित्रपट २०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
‘द केरला स्टोरी’ चित्रपटावरुन सध्या अनेक आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अनेक कारणांमुळे हा चित्रपट चर्चेत आहे. सुदीप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरला स्टोरी’ चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली आहे.
या चित्रपटात तिने साकारलेल्या भूमिकेचं कौतुकही होत आहे. नुकतंच ‘द केरला स्टोरी’ चित्रपटाच्या टीमने प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अदा शर्माने चित्रपटातील काही मुद्दांवर भाष्य केलं. याचा व्हिडीओ विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. “१५ लोकांनी तुमचा बलात्कार केला आहे, हे तुम्ही कसं सिद्ध कराल? महिनाभर १५ लोकांकडून रोज बलात्कार झाला, हे सिद्ध करणं थोडं कठीण आहे. शालिनीला प्रेमात फसवलं गेलं. प्रेमात फसवणूक केल्याची तक्रार कशी केली जाईल?” असं अदा शर्मा म्हणाली.
पुढे ती “प्रेमात फसवलं गेलं, याची दखल घेतली जात नाही. अशाप्रकारे माझ्यावर बलात्कार झाला, त्याने मला या जागी स्पर्श केला, हे लिहू शकत नाही. मी पीडित असलेल्या या मुलींना भेटले. मी एक मुलगी व अभिनेत्री आहे. यांचं दु:ख मी समजू शकते. याबाबत आपल्याला कोणतेही प्रश्न विचारले जाऊ शकतात, हे माहीत असूनही या मुली धैर्याने समोर आल्या आहेत,” असंही म्हणाली.