एसपींचा ‘खबऱ्या’ असल्याचे भासवून त्यानं पोलिसांना टोपी घातली ; पण पोलिसांनी शेवटी ‘खाकी’ दाखवलीच !
काही गुन्हेगार स्वतःला खूपच ‘शातिर दिमाग’ वाले समजतात. त्यांना वाटतं आपल्याला कोणीच पकडू शकत नाही. आपण सर्वांपेक्षा ‘इंटेलिजंट’ आहोत. पण कितीही उड्या मारल्या, तरी अशा लोकांच्या पापाचा घडा कधी ना कधी भरतोच. अशाच एका स्वयंघोषित हुशार भामट्याला वर्धा पोलिसांनी अटक केली आहे. योगेंद्रकुमार अतुलभाई सोलंकी (रा. इंदिरानगर ठाणे) असं या भामट्याचं नाव आहे.
योगेंद्र कुमार स्वतःला एसपी साहेबांचा गुप्त बातमीदार सांगत होता. त्याने पोलिसांना फोन केला, एका खबऱ्याला मोबाईल घेऊन द्यायचा आहे, पैसे टाका पोलिसांना खरे वाटले. पोलिसांनी त्याच्या खात्यावर तीन हजार रुपये टाकले. पैसे आल्यानंतर या भामट्याने मात्र मोबाईल बंद करून ठेवला. आपली फसवणूक झाल्याचे पोलिसांनी ओळखून घेतलं आणि योगेंद्रकुमार चा शोध सुरु केला.
योगेंद्र कुमार या भामट्याने केलेल्या या गुन्ह्याचा संमातर तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेलमार्फत करण्यात आला. त्याच्याबाबत तांत्रिक माहिती हस्तगत केल्यानंतर आरोपी ठाणे शहर परिसरात असल्याची माहिती मिळाली. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आरोपी योगेंद्रकुमार यास ताब्यात घेत बेड्या ठोकल्या.
ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात यशवंत गोल्हर, रामकिसन इप्पर, अनुप कावळे यांनी केली. पोलिसांनी योगेंद्र कुमार या भामट्याकडून २ मोबाईल व ३ हजार २०० रुपये रोख असा मुद्देमाल हस्तगत केला.
स्वतःला फारच बुद्धिमान समजणाऱ्या अशा भामट्यांना असं वाटतं, की आपण पोलिसांनासुद्धा टोपी घालू शकतो. मात्र एक ना एक दिवस अशा भामट्यांची चोरी पकडले जाते. योगेंद्र कुमार हा भामटा किती दिवसांपासून असा उद्योग करत होता, त्याने आतापर्यंत किती पोलिसांना टोप्या घातल्या आणि या त्याच्या लबाडीमध्ये आणखी कोण कोण सहभागी आहेत, याचा तपास वर्धा पोलीस करत आहेत.