‘एटीएम’ फोडण्याचा प्रयत्न फसला! संगमनेर पोलिसांची अभिमानास्पद कारवाई; पाठलाग करीत एकाला पकडले..
संगमनेर – वाढलेला गुन्हेगारीचा स्तर, त्यात चोरट्यांचा उद्रेक आणि अवैध व्यावसायिकांची मोठी भर यामुळे संगमनेरचे सामाजिक वातावरण गढूळ झालेले असतांना शहर पोलिसांकडून अभिमानास्पद वाटावे असे वृत्त समोर आले आहे. या घटनेत शहरातील अतिउच्चभ्रु लोकवस्तीच्या परिसरातील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र माहिती मिळताच अवघ्या तीन मिनिटांत पोहोचलेल्या पोलिसांनी चोरट्यांचा हा प्रयत्न फोल ठरवतांना सिनेस्टाईल पाठलाग करीत त्यातील एकाच्या मुसक्या आवळल्या. या घटनेत विवेक जाधव या कर्मचार्याच्या हातालाही दुखापत झाली आहे. प्रदीर्घ कालावधीनंतर शहर पोलिसांनी केलेल्या या अभिमानास्पद कारवाईचे संगमनेरातून कौतुक होत आहे.
याबाबत संगमनेर शहर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.21) पहाटे 12.50 ते 1 या दहा मिनिटांच्या कालावधीत जाणताराजा मैदानाच्या पुढच्या बाजूला असलेल्या गिरीराजनगर परिसरात घडला. या परिसरात महाराष्ट्र बँकेचे एटीएम असून रात्रीच्यावेळी या परिसरात फारशी वर्दळही नसते. हिच संधी साधून दोघा चोरट्यांनी लोखंडी टामीच्या साहाय्याने सदर एटीएमचा पत्रा उचकटून त्यातून रोकड काढण्याचा प्रयत्न केला.
वाढत्या एटीएमच्या घटना लक्षात घेवून महाराष्ट्र बँकेने आपल्या सर्व एटीएम सेंटरवर ‘डिजीटल’ सुरक्षा यंत्रणांचा वापर केला आहे. आज पहाटे त्यांच्या एटीएम फोडीच्या वेळी याच यंत्रणेने आपले काम दाखवले. सदरील चोरट्यांनी एटीएमच्या पत्र्याला लोखंडी टामी लावून तो उचकटण्याचा प्रयत्न करताच डिजीटल यंत्रणेने तसा संदेश थेट बँकेच्या हैद्राबाद येथील मुख्यालयाला पाठवला. त्यांनीही याबाबत तत्काळ अहमदनगर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधीत संगमनेरात घडत असलेली घटना कळवली.
नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच त्यांच्याकडून बिनतारी यंत्रणेद्वारा संगमनेर शहर पोलिसांना तत्काळ कारवाईच्या सूचना देण्यात आल्या. सदरचा संदेश प्राप्त झाला त्यावेळी पोलीस ठाण्याचे अंमलदार असलेल्या पोलीस उपनिरीक्षक शिवाजी फटांगरे यांनी त्या भागात गस्तीवर असलेल्या गणेश घुले व विवेक जाधव या कर्मचार्यांना त्याबाबतची माहिती दिली. त्यानुसार ते दोन्ही कर्मचारी लागलीच घटनास्थळी पोहोचले व त्यांनी त्या दोघांनाही पकडले. मात्र त्यातील एकाने आपल्याकडील लोखंडी टामीने त्या दोघांवरही हल्ला केला.
त्या गदारोळात एक आरोपी तेथून पसार झाला. यात पोलीस कर्मचारी विवेक जाधव यांच्या हाताला दुखापतही झाली. त्यानंतर काही वेळातच पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार यांच्यासह सचिन उगले व अजय आठरे आदी कर्मचारीही तेथे हजर झाले. त्यांनी पळून गेलेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी मालदाड रोडवर बराच पाठलाग केला, मात्र अंधार आणि असंख्य वसाहतींचे रस्ते याचा फायदा घेत तो पसार झाला.
याप्रकरणी आज पहाटे अडीच वाजता महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक अक्षय संजय जवरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शहर पोलिसांनी पाठलाग करुन पकडलेल्या मंगेश बाळु गांगुर्डे (वय 20, रा.चास, ता.अकोले) याच्यासह त्याच्या अज्ञात जोडीदारावर भा.द.वी.कलम 379, 511, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निवांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. पोलिसांना जलदगतीने केलेल्या या कारवाईचे शहरातून कौतुक होत आहे.