उद्योगस्नेही वातावरणात राजकारण नको ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य !

spot_img

उद्योगस्नेही वातावरणात राजकारण नको ! उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य !

 

राज्याचे दुसरं विकासकेंद्र मुंबईनंतर पुणे शहर असून यादृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी राज्य सरकार कटिबध्द आहे. उद्योगांना पोषक वातावरण उपलब्ध व्हावं, ही खरं तर राज्य सरकारची जबाबदारी आहे. त्यामुळे पुण्यात उद्योग स्नेही वातावरण तयार व्हावं, यासाठी उद्योगांच्या क्षेत्रात राजकारण नको, असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.

 

 

पुण्यातल्या पाषाण रस्त्यालगत असलेल्या पोलीस संशोधन केंद्रात वार्षिक गुन्हेगारी आढावा बैठकीत ते बोलत होते. दरम्यान, कंपनीचं कंत्राट मिळावं, यासाठी जे कोणी उद्योजकांना त्रास देत असतील तर त्यांचं कंबरडं मोडा, असे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पोलिसांना दिले.

 

या आदेशांचं पालन झालं नाही तर पोलिसांविरुध्ददेखील कारवाई केली जाईल, असा इशारा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिला. ते म्हणाले, ‘राज्यात अनेक उद्योजक गुंतवणूक करायला तयार आहेत. मात्र काही बनावट माथाडी कामगारांचे नेते तयार झाले आहेत. माथाडी कामगारांचे हे स्वयंघोषित नेते कंत्राट मिळावं, यासाठी त्रास देत आहेत’.

 

उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, की वर्षभरापूर्वी एक उद्योजक महाराष्ट्रात ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार होता. मात्र कंत्राट मिळावं म्हणून राज्यातल्या एका मंत्र्याच्या माध्यमातून त्या उद्योजकाला धमकावण्यात आलं.

 

महाविकास आघाडी सरकारच्या काळातलं वातावरण पाहून त्या उद्योजकानं महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास नकार दिला आणि कर्नाटकमध्ये गुंतवणूक केली. त्यामुळे यापुढे उद्योजकांना त्रास देणार्‍यांचा बंदोबस्त करा, असे आदेश उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :