आर्थिक गुंतवणूक करताना काळजी घ्या ; फसवणूक झाली असेल तर तक्रार करा ; पुणे पोलिसांनी केलं नागरिकांना आवाहन !
गुंतवणुकीचं आमिष दाखवणाऱ्या अनेक कंपन्या पुण्यात आहे. या कंपन्यांकडे अनेकांची यादी असू शकते. त्यामुळे कोणत्याही कंपनींत किंवा कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी काळजी घेण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय. पोलिसांनी तपास केला आणि CryptoBiz एक्सचेंज आणि CryptoBiz ॲप वापरून आरोपींचा शोध घेतला. आरोपींना अटक करून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस इतरांना पुढे येऊन घटनांची तक्रार करण्याचे आवाहन करत आहेत.
पुण्यात बाकी गुन्ह्यांबरोबरच (Pune Cyber Crime news) सायबर गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. रोज अनेकांना अनेक गोष्टींचं आमिष दाखवून कोट्यवधींचा गंडा घातल्याचे प्रकार समोर आले आहेत. सायबर पोलिसांच्या पथकाने क्रिप्टोबिझ कंपनीचा संचालक राहुल विजय राठोड (वय 35, रा. हिंजवडी) याच्यासह त्याचा साथीदार ओंकार दीपक सोनवणे (25, रा. कोंढवा) याला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली आहे.
या दोघांवर 43 हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा आरोप असून, त्यांनी सुमारे 2 कोटी 930 लाख रुपयांची फसवणूक केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. पोलिसांनी आरोपींकडून महागड्या कार, इलेक्ट्रॉनिक वस्तू, दोन दुचाकी, एक मोटारसायकल, एक लॅपटॉप, एक मोबाईल संच, एक पेन ड्राईव्ह जप्त केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी तक्रारदारांपैकी एक असलेल्या रविशंकर पाटील यांना त्यांच्या योजनेत गुंतवणूक केल्यास मोठा परतावा देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांनी अनेकांना वेळोवेळी गुंतवणुकीवर परतावा दिला. मात्र अधिक पैसे गुंतवल्यावर त्यांनी त्यांना पैसे देणे बंद केले आणि त्यांची गुंतवणूक परत केली नाही. अनेकांनी राठोड यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.