अहमदनगर जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाच्या दृष्टीने सर्वांगीण आराखडा तयार करा
जिल्हाधिकारी सिद्धाराम सलीमठ यांच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
अहमदनगर जिल्ह्यातल्या औदयोगिक क्षेत्राचा अधिक विकास व्हावा, यासाठी उद्योग विकासाला आवश्यक असणाऱ्या बाबींचा आराखड्यात समावेश करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींकडून सूचना मागविण्यात याव्यात. जिल्ह्याच्या औदयोगिक क्षेत्रात कौशल्यवर्धित मनुष्यबळाची मागणी लक्षात घेत तरुणांना कौशल्यावर आधारित प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात यावी. तसेच जिल्ह्यात पर्यटनवृद्धीसाठी मोठा वाव असून याचाही आराखड्यात समावेश करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी यावेळी दिल्या.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन २०४७ पर्यंत “विकसित भारत करण्याचा संकल्प केंद्र शासनाकडून करण्यात आला आहे. विकसित भारताची ही उद्दिष्टे साध्य करीत असताना भारतातील राज्यांना सुध्दा सन २०४७ पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन २०२७ पर्यंत १ ट्रिलियन डॉलर, सन २०३७ पर्यंत २.५ ट्रिलियन डॉलर व सन २०४७ पर्यंत ३.५ ट्रिलियन डॉलर इतकी पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा विकास आराखडाबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी जिल्हाधिकारी सालीमठ बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, संबंधित विभागांचे विभाग प्रमुख, औद्योगिक संघटना प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
विकास आराखडा सर्वसमावेशक असावा
केंद्र शासनाने सन 2047 पर्यंत विकसनशील भारत निर्माणाचा संकल्प केला आहे. विकसनशील भारत निर्माणामध्ये प्रत्येक राज्य व जिल्ह्याच्या अधिक प्रमाणात विकास होणे गरजेचे आहे. त्यानुसार जिल्ह्याच्या विकासाचा सर्वसमावेशक असा विकास आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले.