अहमदनगरच्या एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता वाघ साहेब!
चाकण ऑईल मिलच्या प्लाॅट चं काय केलंय तुम्ही? अहो, या प्लाॅटचा चक्क गैरवापर
होतोय!
अहमदनगरच्या एमआयडीसी परिसरातल्या ज्या A/11 या प्लाॅटवर यापूर्वी चाकण ऑईल मिल कंपनी कार्यरत होती. सुमारे चार-पाच एकराच्या या विस्तीर्ण जागेत यापूर्वी दिमाखात सुरु असलेल्या चाकण ऑईल मिलमुळे अनेक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न मार्गी लागला होता. संगळं काही सुरळीत सुरु असताना दुर्दैवाचा फेरा आला आणि चाकण ऑईल मिल कंपनी स्थलांतरित झाली.
पण या निमित्तानं इथले कार्यकारी अभियंता वाघ यांना पुन्हा एकदा एक महत्वाचा प्रश्न विचारावासा वाटतो, की कार्यकारी अभियंता वाघ साहेब, चाकण ऑईल मिलच्या A/11 या प्लाॅटचं काय केलंय तुम्ही? अहो, तुमच्या कार्यालयाच्या ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आणि स्वतःच्या फायद्यासाठी बेजबाबदारपणामुळे या प्लाॅटचा चक्क गैरवापर होतोय.
या चार-पाच एकराच्या विस्तीर्ण प्लाॅटमध्ये आजमितीला अनेक गोडावून, गॅरेज, ट्रान्सपोर्ट आणि भंगाराची दुकानं सुरु आहेत. चाकण ऑईल मिल या कंपनीला दिलेल्या या जागेवर भाडेकरु किंवा पोटभाडेकरु टाकण्यासाठी तुमच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसीच्या व्यवस्थापनानं परवानगी दिली का? दिली असेल तर कोणत्या अधिकारानुसार ही अशी परवानगी दिली गेली?
वास्तविक पाहता पुनर्निविदा Retendering मागवून या चार-पाच एकरच्या जागेत दुसरा एखादा मोठा उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असताना यासाठी वाघ साहेब, तुम्ही नक्की काय प्रयत्न केले? या एवढ्या मोठ्या जागेचा केवळ तुमच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसी कार्यालयाचे ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्षामुळे गैरवापर होत आहे.
या A/11 प्लाॅटच्या चार-पाच एकराच्या विस्तीर्ण अशा परिसरात नवीन कंपनी आणायचीच नाही का? अहो, या परिसरात एखादा नवीन उद्योग आणल्यास कामगारांना रोजगाराची संधी मिळेल, मोठ्या उद्योगांवर अवलंबून असलेल्या छोट्या उद्योगांना चालना मिळेल. मग यासाठी वाघ साहेब, आपण नक्की काय प्रयत्न केलेत?
या A/11 प्लाॅट च्या परिसरात कोणाच्या परवानगीनुसार पोटभाडेकरु टाकण्यात आले? आपल्या कार्यालयाला या परिसराचं किती भाडं मिळतंय? यासाठी जो करार करण्यात आला, यासाठी जे भाडं आकारण्याचं ठरविण्यात आलंय, त्या सर्व नोंदी आहेत का तुमच्याकडे? असं तर नाही ना झालं, करार एकाच्या नावावर आणि जागा वापरतोय भलताच? असे असेल तर ही गंभीर चूक आहे व ही आपली जबाबदारी आहे.
वाघ साहेब, या चार-पाच एकराच्या परिसरात इंडस्ट्रियल झोनच्या नियमांचं तुमच्या कार्यालयाने पूर्णत: उल्लंघन केल्याचं दिसतंय. या जागेत एखादा मोठा उद्योग असण्याऐवजी तिथं गोडावून, गॅरेज, ट्रान्सपोर्ट आणि भंगाराची दुकानं कोणाच्या आशिर्वादानं सुरु आहेत? या जागेचा गैरवापर होतोय त्यातून शासनाचा जो महसूल बुडतोय, त्याची जबाबदारी वाघ साहेब, तुम्ही घेणारच नाहीत का?
‘महासत्ता भारत’नं यापूर्वीदेखील एका भागात एमआयडीसी परिसरातल्या काही कंपन्यांमध्ये इंडस्ट्रियल झोनवर खाजगी अतिक्रमण झाल्याचा मुद्दा उपस्थित करुन या गंभीर विषयाकडे सर्वांचंच लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र याकडे वाघ साहेब, आपल्या कार्यालयाचे जाणीवपूर्वक ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष होत असल्याचं या भागातले नागरिक आता जाहिरपणे बोलताहेत.
वाघ साहेब, हा इंडस्ट्रियल प्लाॅट आहे. या प्लाॅटवर मोठा उद्योग आणण्यासाठी खर्या अर्थानं प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. व यासाठीच शासनाने आपली नेमणूक केली आहे. यासंदर्भात राज्याचे उद्योगमंत्री आणि या खात्याच्या सचिवांकडे तुम्ही सातत्यानं पाठपुरावा करण्याची खरं तर खूप मोठी गरज आहे. मात्र असं न करता या इंडस्ट्रियल प्लाॅटचा कमर्शियल वापर होत असताना तुम्ही हातावर हात धरुन कसं काय बसू शकता?
नगरच्या औद्योगिकरणाला किंबहूना इथल्या एमआयडीसीच्या विस्तारीकरणाला अनेक वर्षांपासून जो ब्रेक लागलाय, तो खरं तर वाघ साहेब, तुमच्या कार्यालयाच्या बेजबाबदारपणामुळेच, असं आम्हाला या परिसरातूनच ऐकायला मिळतंय. यातून शासनाचा किंबहूना आमचा म्हणजे जनतेचं जे आर्थिक नुकसान होतंय, त्याची कारण मिमांसा स्पष्ट केल्याशिवाय वाघ साहेब, तुम्हाला नक्कीच सुट्टी नाही.
क्रमश: