अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्या टेम्पो, चार ब्रास वाळू असा मुद्देमाल जप्त ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई !
अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी पोनि दिनेश आहेर (स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर) यांना जिल्ह्यातल्या अवैध वाळू उत्खनन / उपसा व वाहतुकीविरुध्द कारवाई करणे बाबतचे आदेश दिले होते. या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतल्या पोना / सचिन आडबल, विशाल गवांदे, पोकॉ / शिवाजी ढाकणे, आकाश काळे आणि चापोहेकॉ/संभाजी कोतकर हे राहुरी तालुक्यात अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे करीता पेट्रोलिंग करत होते.
पोनि दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की गणेश व त्रिभुवन अजय बर्डे हे दोन वेगवेगळ्या टेम्पोमधून तांदुळवाडी (स्टेशन, ता. राहुरी) येथे मुळा नदीपात्रात मजुरांच्या सहाय्याने अवैध वाळु उत्खनन करुन वाळू टेम्पोमध्ये भरुन चोरुन वाळू वाहतूक करत आहेत.
पोनि / दिनेश आहेर यांनी नमूद माहिती लागलीच पथकास कळवून पंचांना सोबत घेवून खात्री करुन कारवाई करणे बाबतचे सूचना दिल्या. या सुचनांप्रमाणे पथकातल्या पोलीस अंमलदार यांनी पंचांसह तांदूळवाडी स्टेशन (ता. राहुरी) येथील मुळा नदीपात्रात जावून आडोशाला थांबून खात्री केली असता मुळा नदीपात्रातून मजुराच्या सहाय्याने दोन टेम्पोमध्ये वाळू भरतांना दिसले.
पोलीस पथक व पंचांची खात्री होताच पथक अचानक छापा टाकून पकडण्याचे तयारीत असताना मजूर पोलीस पथकास पाहून काटवनात पळून गेले. दोन्ही टेम्पोमध्ये बसलेल्या चालकांना ताब्यात घेवून पोलीस पथकाची ओळख सांगून त्यांच्याकडे वाळू वाहतुकीच्या परवान्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी त्यांचेकडे शासनाचा वाळू उत्खनन /उपसा किंवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसल्याचं सांगितलं.
पथकाने त्यांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या इसमांना त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे गणेश बाबासाहेब त्रिभुवन (वय 31, रा. राहुरी स्टेशन, ता. राहुरी) व करण अनिल जाधव (वय 19, रा. आरडगांव, ता. राहुरी) असे सांगितले. त्यांच्याकडे टेम्पो मालकाबाबत विचारपूस करता त्यांनी सदर टेम्पो इसम अजय बर्डे (रा. देसवंडी, ता. राहुरी) याच्या मालकीचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी पळून गेलेल्या मजुरांचा शोध घेतला. परंतू ते मिळून आले नाही.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी अवैधरित्या राहुरी येथील मुळा नदी पात्रातून शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकीय मालकिची वाळू अवैध उत्खनन व चोरी करुन पर्यावरणाचे नुकसान होईल, असे कृत्य केल्याने आरोपींना 6,40,000/- (सहा लाख चाळीस हजार) रुपये किंमतीचे दोन टेम्पो व चार ब्रास वाळूसह ताब्यात घेवून त्यांच्याविरुध्द राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 362/2023 भादविक 379, 34 सह पर्यावरण कायदा कलम 3, 15 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई राकेश ओला (पोलीस अधीक्षक, अहमदनगर), श्रीमती. स्वाती भोर मॅडम (अपर पोलीस अधिक्षक, श्रीरामपूर) आणि संदीप मिटके, (उपविभागीय पोलीस अधीकारी, श्रीरामपूर विभाग) यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.