‘अवकाळी’च्या रुपात काळ आला ; ६ जणांसह २९ जनावरांचा मृत्यू ! 

spot_img

‘अवकाळी’च्या रुपात काळ आला ; ६ जणांसह २९ जनावरांचा मृत्यू ! 

राज्यात अनेक ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी वीज, वादळवाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. या आपत्तीमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. याशिवाय २९ जनावरे मृत पावली आहेत. ७ हजार १५८ हेक्टरमधील रब्बी, भाजीपाला व फळपिकांचे नुकसान झाले आहे. अमरावतीमध्ये १५१ घरांची पडझड झालीय.

दरम्यान, अंगावर वीज कोसळून बुलढाणा जिल्ह्यात २, अमरावती व अकोला जिल्ह्यात प्रत्येकी १, हिंगोलीमध्ये १ आणि परभणीमध्ये एक एकून अशा ६ जणांचा मृत्यू झाला आहे. पश्चिम विदर्भात अवकाळी पावसाने गहू, कांदा, मिरची, लिंबू, संत्रा, आंबा, हरभरा, टरबूज, पपई, भाजीपाला, शेवगा, तूर, मका, ज्वारी, हळद व सूर्यफुलाचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये सर्वाधिक ५ हजार २४२ हेक्टरमध्ये अकोला जिल्ह्यात, १ हजार १२० हेक्टर बुलढाणा, ५२३ हेक्टर अमरावती, २५५ हेक्टर यवतमाळ व १८.४८ हेक्टरमध्ये वाशिम जिल्ह्यात नुकसान झाले आहे.

11 एप्रिलपर्यंत पावसाचा जोर कायम राहील अशा सूचना हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत.

अहमदनगर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातले असून अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यामध्ये पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले आहे. काढून ठेवलेला कापूस आणि गहू पावसाने ओला झल्याने त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक घरांचे पत्रे उडून गेले असून अनेक ठिकाणी मोठमोठे झाडे पडल्याने वीज खंडित झाली आहे. तर काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात गारपीट झाल्याने उभे पिके भूईसपाट झाले आहेत.

या अवकाळी पावसामुळे कांदा, मिरची , टोमॅटो पिकांचं मोठं नुकसान!

रत्नागिरीमध्ये देखील अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. दक्षिण आणि उत्तर रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या तुरळक सरी बरसल्या आहेत. पहाटेच्या सुमारास जवळपास वीस मिनिटं अधिक अवकाळी पाऊस बरसला आहे. आंबा बागायतदरांमध्ये यामुळे धास्ती भरली आहे. अवकाळी पावसामुळे आंब्याचे दर गडगडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

 

दोन दिवसांपासून पंढरपूर परिसरात वादळी वारे व अवकाळी पाऊस सुरू आहे. रात्री पंढरपूर तालुक्यातील केसकरवाडी येथे एका शेतकऱ्याच्या घरासमोरील नारळाच्या झाडावर वीज पडली. वीज पडल्याने नारळाच्या झाडाने पेट घेतला. तर ईश्वर वठार गावात ही वीज पडून एका शेतकऱ्याच्या गायीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :