अरे बाप रे ! भामट्यांनी घरफोडीत लांबवले ९२ लाखांचा मुद्देमाल !
बंद घराचा दरवाजा तोडून घरातील हिरे, सोने, चांदी, रोख २५ लाख रुपयांच्या रकमेसह एकूण ९२ लाख रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली.
रविवारी मध्यरात्रीनंतर शहरातील मटकरी गल्लीतील रहिवासी आनंद पालडीवाल यांच्या निवासस्थानी ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले, मात्र कोणताही माग मिळाला नाही.
आईची तब्येत बरी नसल्यानं पालडीवाल कुटुंबीय उपचारासाठी जालना येथे गेले होते. रविवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी संधी साधली. ही बाब सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. सोमवारी सकाळी शेजाऱ्यांना पालडीवाल यांच्या घरातल्या वस्तूंबाबत शंका आल्याने त्यांनी ही माहिती घरमालकाला दिली.
त्यानुसार आनंद पालडीवाल सोमवारी दुपारी शहरात आले. त्यांनी घरातील बाबींची पाहणी केली असता घरफोडी झाल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी त्यांनी शहर पोलिसात तक्रार दिली.
त्यामध्ये घरातील हिरे, १ हजार ५०० ग्रॅम (दीड किलो) सोने, दोन किलो चांदी तसेच रोख २५ लाख रुपये असे एकूण ९२ लाख रुपयांच्या मुद्देमाल चोरी गेल्याचे नमूद केले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने श्वान पथकाला पाचारण केले. मात्र,श्वान तेथेच घुटमळले कोणताही माग श्वानाने काढला नाही. घटनास्थळी ठसे तज्ज्ञांनीही तपासणी केली.
पोलिसांनी पालडीवाल यांच्या घरासह शेजारच्या सीसीटीव्ही मधील फुटेजची पाहणी केली. घटनास्थळाला अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल कोळी, ठाणेदार आनंद गोपाळ यांच्यासह पोलिसांचा ताफा ठाण मांडून होता.
रात्री उशिरापर्यंत शहर ठाण्यात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांनी पाहणी केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोघे जण रविवारी मध्यरात्री १ वाजेनंतर घरात प्रवेश करीत असल्याची नोंद झाली आहे.