अरेरे ! एकुलत्या एक मुलाच्या दोन्हीही किडण्या झाल्या निकामी !

spot_img

अरेरे ! एकुलत्या एक मुलाच्या दोन्हीही किडण्या झाल्या निकामी !

 

बहिणीच्या लग्नासाठी ठेवलेले सारे पैसे मुलाच्या शारिरीक तपासण्यांवरच झाले खर्च !

 

ईश्वरालाच माहित, कधी संपणाय ‘या’ कुटुंबाचा दुर्दैवाचा फेरा ?

 

बीड जिल्ह्यातल्या माजलगाव शहरातल्या मोंढा भागात राहत असलेल्या अयोध्यानगरच्या एकुलत्या एक २३ वर्षीय मुलाच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्या. बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे गजाननच्या केवळ तपासणीतच संपले. आता पुढील उपचारासाठी वडिलांनी घर विक्रीसाठी काढले आहे.

 

अयोध्यानगर भागात अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेले विठ्ठल सुखदेव गायगवे हे मोलमजुरी करतात तर त्यांची पत्नी संगीता विठ्ठल गायगवे ह्या एका अंगणवाडीत मदतनीस म्हणून काम करतात. या दोघांच्या उत्पन्नातून कसाबसा घरखर्च करून मुलीच्या लग्नासाठी थोडेफार पैसे जमवून ठेवत असत.

 

 

दिवाळी झाल्यानंतर मुलीसाठी सोयरीक पाहावी आणि तिचे लग्न करण्याचे ठरले. त्याचवेळी त्यांचा बी.काॅम.च्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेल्या गजाननला दिवाळीत लक्ष्मीपूजन चालू असताना अचानक नाकातून रक्ताची गाठ पडली. कसे तरी लक्ष्मीपूजन करुन शहरातल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु केले.

 

येथील डॉक्टरांनी गजाननला पुढील उपचारासाठी औरंगाबादला जाण्याचा सल्ला दिला. तेथे गेल्यानंतर त्याच्या पूर्ण तपासण्या करण्यात आल्या. वेगवेगळ्या तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी गजाननच्या दोन्ही किडण्या निकामी झाल्याचं सांगितलं.

 

हे ऐकून सर्व कुटुंबियांचे हातपायच गळाले. त्यानंतर गजाननच्या वेगवेगळ्या तपासण्या करण्यात आल्या. त्यात वडिलांच्या किडण्याचेदेखील नमूने घेण्यात आले. गजाननच्या आणि त्याच्या वडिलांच्या किडण्याचे नमूने जुळल्याने आता वडिलांची किडणी द्यायचे ठरले.

 

गजानन आणि त्याच्या वडिलांच्या तपासण्या तपासण्यामध्येच गायगावे कुटुंबाचे 5 लाख रुपये खर्च झाले. अजून पाच लाखांचा खर्च येणार आहे.

 

मुलीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे संपून गल्लीतल्या काही नागरिकांनी थोडे फार पैसे गोळा करून दिले होते. ते उपचारात संपल्याने आता गजाननच्या वडिलांनी त्याच्या पुढील उपचारासाठी आपले छोटेसे घरदेखील विक्रीसाठी काढले आहे.

 

 

विठ्ठल गायगवे यांनी आपल्या मुलीसाठी स्थळ पाहणे थांबवले असून मुलाला वाचविण्यासाठी त्यांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. कुटुंबियाची परिस्थिती पाहता आणि आपल्याला झालेला आजार पाहता आपल्याला जगायची इच्छा नाही, असे वाटू लागले. त्यामुळे अनेकदा आत्महत्येचे विचारदेखील आले.

 

यामुळे रात्र रात्र झोप येत नव्हती. केवळ युट्युबवर या आजाराविषयी माहिती घेत बसायचो. दरम्यान दीड महिन्यांत २० किलो वजन कमी झाल्याचं आजारी असलेल्या गजानन गायगवेनं सांगितलंय.

 

या आजारामुळे गजाननला किडनी प्रत्यारोपण करण्याची गरज आहे. परंतू त्याची आर्थिक परिस्थिती पाहता हे काम करणे त्याच्यासाठी शक्य नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी आणि समाजसेवक, सामाजिक संस्थांनी गजाननच्या किडनी प्रत्यारोपणासाठी हातभार लावणे गरजेचे आहे. मी माझ्यापरीने जेवढी शक्य होईल, तेवढी मदत करणार आहे, असं गजाननवर इलाज करणारे डॉक्टर डॉ. ज्ञानेश्वर गिलबिले यांचं म्हणणं आहे.

 

दरम्यान, मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे आमचे कोटेशन पाठवले आहे. ते अद्याप मंजूर झालेले नाही. तोपर्यंत आम्ही घर विक्रीला काढले आहे, असं

गजाननचे वडील विठ्ठल गायगवे यांनी सांगितलंय.

संबंधित बातम्या

टॉप न्यूज़

महत्त्वाच्या इतर बातम्या :